|सहकारनामा|
दौंड : हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री करीना कपूर- खान हिने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य केले आहे, या संतापजनक घटनेचा दौंड मधील ख्रिश्चन एकता मंच संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला व करीना कपूर विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत संघटनेच्या वतीने दौंड पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विश्वास भोसले, याकोब जगले, रतन जाधव, फिलीप दाखले, देव साह्यम आदि उपस्थित होते.
अभिनेत्री करीना कपूर हिने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे नाव हे ख्रिश्चन समुदायाच्या पवित्र ग्रंथाचे नाव वापरून पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे तमाम ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी अभिनेत्री फराह खान हिनेदेखील एका कार्यक्रमामध्ये पवित्र शब्दाचा अवमान करीत ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पुन्हा करीना हिने पवित्र ग्रंथाच्या नावाचा संतापजनक व समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीने वापर केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही घटना अतिशय निंदनीय असून तमाम समाज बांधव करीना कपूर हिचा जाहीर निषेध करीत आहेत असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी हे निवेदन स्वीकारले.