दौंड : शहरातील अहिल्यादेवी होळकर, सहकार चौक परिसरातील इरिगेशन कॉलनी मध्ये घोरफोडीची घटना घडली. चोरट्याने घरातील दिवाणामध्ये ठेवलेले तब्बल 10 लाख 72 हजार रु. किमतीचे सोन्या -चांदीचे दागिने लंपास केले आहे. प्रिया महेश रणसिंग (वय 30,रा. इरिगेशन कॉलनी, दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार,दि.14 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 8.40 वा. च्या दरम्यान सदरची घटना घडली आहे. फिर्यादी यांच्या नातलगाकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, त्यामुळे घरातील सर्व सदस्य सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास घराला कुलूप लावून कार्यक्रमाला गेले होते. घरातील सदस्यांना त्या ठिकाणी सोडून फिर्यादी यांचे दीर पुन्हा घरी आले. रात्री 8 वा. फिर्यादी यांच्या नातलगांनी घरी असलेल्या दीरासही जेवायला बोलविले. त्यामुळे फिर्यादी यांचे दीर घराला कुलूप लावून कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले होते.
रात्री 8.40वा. दरम्यान फिर्यादी व घरातील सदस्य पुन्हा घरी आले असता त्यांना घरातील हॉलमध्ये असलेल्या दिवाणावरील फळी अर्धवट उघडी दिसली. त्यांना संशय आल्याने दिवाणाची फळी उघडून पाहिले असता त्यामध्ये ठेवलेला सोन्या चांदीच्या दागिन्यांचा डबा दिसून आला नाही, परंतु डब्याचे झाकण मात्र तिथेच पडलेले सापडले. दागिन्यांची चोरी झाली असल्याचे दिसल्याने त्यांनी घराची पाहणी केली, तेव्हा घरातील बाथरूमच्या खिडकीला असलेली जाळी उचकटलेली दिसली.
चोरट्यांनी बाथरूम मधील जाळी उचकटून त्या वाटे घरात प्रवेश करून, सोन्याच्या बांगड्या, पाटली, चैन, अंगठी, गंठण, राणीहार, कानातील फुले, वेल, नथ, बोरमाळ व चांदीचे भांडे असा एकूण 10 लाख 72 हजार 200 रु चा ऐवज चोरून नेला असल्याचे सिद्ध झाले. सदरची चोरी विकी अजित रणसिंग (रा.जनता कॉलनी,दौंड) याने केली असल्याचा संशय फिर्यादीकडून फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला आहे.