हवेली तालुक्यात भर दुपारी कोयता, तलवारींचा धाक दाखवून ज्वेलर्सवर दरोडा.. 1 कोटी 43 लाख 57 हजारांचे दागिने लंपास

अब्बास शेख

पुणे : सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या खानापूर येथील एका ज्वेलरी दुकानावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे ११४.७ तोळे सोने आणि २० हजार रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ४३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात ५ अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणी अमोल बाबर (वय २८, रा.खानापूर, ता.हवेली जि.पुणे) यांचे खानापूर गावच्या हद्दीत पुणे पानशेत रोड लगत वैष्णवी ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी विक्री चे दुकान आहे. दिनांक २६/१२/२०२५ रोजी दुपारी १२:३० च्या दरम्यान ५ अज्ञात दरोडेखोर या ज्वेलरी दुकानात घुसले आणि त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कोयता, तलवार आणि इतर घातक शस्त्रांचा फिर्यादी यांचे पती अमोल बाबर आणि कामगारांना धाक दाखवून दुकानातील सुमारे दिड कोटींचे दागिने लुटून नेले.

भर दुपारी रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने खानापूर परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैशाली पाटील या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनेची सर्व माहिती घेत पोलिसांची वेगवेगळी पथके दरोडेखोरांच्या मागावर पाठवली आहेत. इतक्या मोठ्याप्रमाणावर दागिन्यांची चोरी होण्याची ही हवेली तालुक्यातील पहिलीच घटना असून यामुळे संपूर्ण हवेली तालुक्यातील सराफ मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील या करीत आहेत.