अख्तर काझी
दौंड : शहरातील खाटीक गल्ली येथील ईदगाह मैदान परिसरातुन कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या तीन जर्सी गाया व गोमांस गोरक्षक व पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खाटीक गल्ली येथे राहणाऱ्या चार जणांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तनवी कुरेशी, वाजिद कुरेशी, बब्या कुरेशी, इस्माईल कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (राहणार उरळीकांचन, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 1:40 वाजण्याच्या दरम्यान खाटीक गल्ली परिसरात घडली. खबऱ्यामार्फत फिर्यादी यांना खबर मिळाली होती की तनवी कुरेशी, वाजिद कुरेशी, बब्या कुरेशी, इस्माईल कुरेशी या चौघांनी पिकअप गाडीमध्ये गोवंश घेऊन आले आहेत व त्याच रात्री त्यांची कत्तल करणार आहेत.
याची माहिती त्यांनी शहरातील गोरक्षक व पोलिसांना कळविली. फिर्यादी व गोरक्षक पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी आले असता त्या ठिकाणी पिकअप टेम्पो उभा होता. टेम्पो मध्ये तनवी व वाजीद कुरेशी हे गोवंश ची कत्तल करीत होते तर बब्या व इस्माईल कुरेशी बाहेर उभे असलेले दिसले. गोरक्षक व पोलिसांची चाहूल लागताच ते परिसरातील झाडीतून पळून जाऊ लागले यावेळी त्यांना आवाज दिला असता ते न थांबता पळून गेले.
टेम्पोतून अंतुल्याचे कापलेले धड, जर्सी गाया व टेम्पो असा एकूण 2 लाख 60 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून, सदर धडाची पाहणी करून काही मांस नमुन्या करता काढून घेऊन पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले. उर्वरित धड व मांस हे नाशवंत तसेच शरीरास अपायकारक असल्याने नगरपालिकेच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.