केडगाव (दौंड) : राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील 1 ते 15 वर्षाखालील बालकांना मार्च 2025 पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, केडगाव ता. दौंड, जि.पुणे येथे जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीमेस यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली.
जपानीज एन्सेफलायटीस हा आजार 15 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात अक्युट एन्सेफलायटीस सिन्ड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे 70 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात किंवा त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्यूरोलॉजीकल अक्षमता आढळून येते. त्यामुळे सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळा अंतर्गत 1 वर्ष ते 15 वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
आज दि. 10/03/25 रोजी स्वामी विवेकानंद विद्यालय, आंबेगाव पासून प्राथमिक आरोग्य केंद्र केडगाव यांच्या वतीने लसीकरण मोहीमेस सुरुवात करण्यात आली. आज एकुण 238 मुले व 184 मुलींना ही लस देण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निलेश कुंभार व सौ.मोरे ताई, मुख्याध्यापिका सौ. शारदा जाधव व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, केडगाव मधील डॉ. निलीमा लोखंडे, वैद्यकिय अधिकारी यांनी जपानीज एन्सेफलायटीस आजार व लसीबद्दल माहीती दिली. याप्रसंगी आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका, आरोग्य सहाय्यक, सर्व आरोग्य सेविका, सर्व आरोग्य सेवक, ॲम्ब्युलन्स ड्रायवर, तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. 1 वर्ष ते 15 वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सर्व पालकांना, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ.केंद्र केडगाव यांच्या वतीने करण्यात आले.