जालना मराठा आंदोलक लाठी हल्ला प्रकरण | पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर तर या अधिकाऱ्यांवरही कारवाई

पुणे : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येत असून जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाठीमाराच्या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती दिली.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.

तसेच मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.