दौंड (अख्तर काझी) : गावचे पाटील तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे पाटील, महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. पाटलांच्या ग्राउंड प्रचाराने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुती मधील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह खूपच वाढल्याचे दिसले.
इंद्रजीत जगदाळे पाटील यांनी मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत मूळ गावठाणातील रहिवासी व मुख्य बाजारपेठेतील व्यापारी वर्गाशी संवाद साधला व आमदार राहुल कुल यांना मतदान करून तिसऱ्यांदा विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. थोरले पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सुद्धा राहुल कुल यांच्या विजयासाठी तालुक्यातील पूर्व भागात मोठी फिल्डिंग लावली असल्याचे पहायला मिळत आहे. या भागातील प्रत्येक प्रचार सभेत त्यांनी सहभाग घेत राहुल कुल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पूर्व भागातील जगदाळे यांचे कार्यकर्तेही जोमाने प्रचाराला लागलेले दिसत आहेत.
गुरुनानक जयंती निमित्ताने ,आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,इंद्रजीत जगदाळे यांनी एकत्र येत येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले तसेच उपस्थित सिंधी समाजाला गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कुल- कटारिया -जगदाळे एकत्रितपणे पहिल्यांदाच प्रभागात प्रचाराला आल्याने एक वेगळेच आशादायी चित्र मतदारांना पाहायला मिळाले. खुद्द पाटीलच आमदार कुल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा जोमाने प्रचाराला लागलेले आहेत, आणि त्यांना कुल- कटारिया गटाचे कार्यकर्ते सुद्धा चांगली साथ देत असल्याचे दिसले.
शहरातील सर्वच प्रभागात राहुल कुल यांचा प्रचार मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे, महायुती मधील सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजुटीने प्रचार यंत्रणा राबवून शहरात धुराळा उडविला असल्याचे चित्र आहे. कूल-कटारिया-जगदाळे आणि मित्र पक्षांच्या झालेल्या संगमामुळे शहरात आमदार राहुल कुल यांना यावेळेस मताधिक्य मिळणारच असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, युवा अध्यक्ष निखिल स्वामी ,रुपेश कटारिया, उमेश जगदाळे, रितेश ओझा, विक्रम बाबा पवार , संजय बारवकर, उमेश वीर, उल्हास पवार, सोनू जगदाळे, अमित जगदाळे, शंतनु निंबाळकर, रियाज पटेल, राजेश जाधव, आकाश गणेशकर ,अमित कदम तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.