‘आयर्विन’ पुलास 93 वर्ष पूर्ण, जाणून घ्या ‘या’ पुलाचे असाधारण महत्व

सुधीर गोखले

सांगली : सांगली मधील कित्तेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला आणि कृष्णा नदीवर अनेक पुराच्या पाण्याचा सामना करत दिमाखात उभा असलेला सांगलीकरांचा ‘आयुर्विन पूल’ ९३ वर्षांचा झाला आहे. कालच या पुलास ९३ वर्षे पूर्ण झाली. या पुलावर असलेल्या तत्कालीन नामफलकास सांगलीतील काही नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून एकप्रकारे वाढदिवस साजरा केला.

शतकी वाटचाल करणाऱ्या या पुलाबद्दल एकप्रकारे नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त केली गेली. या वेळी सांगलीतील केदार खाडिलकर, सतीश खंडागळे, मुकुंद पटवर्धन, विजय कडणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या पुलाचे उदघाटन ब्रिटीश राजवटीमधील तत्कालीन तिसावे व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड आयुर्विन यांनी केले होते त्यांचेच नाव या पुलास देण्यात आले.

सांगलीत इ.स. १९१४ व इ.स. १९१६ साली आलेल्या महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. यासाठी तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला. व इ.स. १९२७ साली पुलाचे बांधकाम सुरू होऊन इ.स. १९२९ साली ते पूर्ण झाले. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाईसराय आयर्विन यांच्या हस्ते इ.स. १९२९ साली झाल्याने या पुलाला त्यांचे नाव देण्यात आले होते.

कृष्णा नदीला आलेल्या अनेक महापुरात देखील दिमाखात आणि भक्कमपणे उभा असलेल्या या पुलाचा प्रत्येक वाढदिवस सांगलीकर मोठ्या उत्साहात साजरा करतात. तत्कालीन सांगलीचे अधिपती दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेला पूल तितकाच भव्य उंच आणि भक्कम असून स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेला हा पूल विद्युत रोषणाई मुळे अधिकच खुलून दिसत आहे.