इंदापूर : इंदापूर जि.पुणे येथे सोनाई दुध डेअरीच्या दोन टॅंकरवर झालेल्या हल्ला प्रकरणी १२ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण सुखदेव मोरे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
किरण मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.०७/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० च्या सुमारास ते इंदापुरच्या हद्दितील सोलापुर ते पुणे जाणाऱ्या अकलुज ब्रिज जवळील सर्व्हीस रोडवर दुधाने भरलेला टॅंकर सोनाई डेअरीकडे घेवून जात असताना अचानकपणे २२ ते २४ वयोगटातील ६ ते ७ इसम तोंडाला रूमाल बांधून टॅंकर समोर आले आणि टॅंकर आडवून त्यातील एकाने टॅंकर च्या कॅबीनमधिल चावी काढून घेवून टॅंकरच्या काचा फोडत शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली. तसेच फिर्कयादी यांच्या पॅन्ट च्या पाठिमागील खिशातील ५०० रुपये बळजबरीने घेतले आणि जाताना टॅंकर च्या मागे जाऊन दुधाचे वालचे सिल तोडून वाल चालू करून सुमारे ५ ते ६ हजार लिटर दुध खाली सोडून १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्याच प्रमाणे दुसऱ्या घटनेमध्ये सोनाई दुध डेअरीकडे जाणाऱ्या दुध टँकर नं एम एच ४२ टी ४००० वरील ड्रायव्हर शरद बबन घाडगे हा त्याच्या टॅंकरमध्ये भाटनिगाव ते काळेवाडी नं. १ येथील दुध भरून तो टॅंकर सोनाई डेअरी येथे खाली करण्यासाठी सायंकाळी जात असताना त्याच्या पाठिमागून स्प्लेंन्डर व शाईन मोटारसायकल वरून आलेल्या ५ अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटारसायकली टँकरला आडव्या लावून हातातील काठ्यांनी टँकरचे नुकसान करून कॅबीनची काच फोडली. तसेच टँकर च्या पाठिमागील वॉल चे सिल तोडून सुमारे ७ हजार लिटर दुध सोडून १लाख ७५ हजार रुपयांचे चे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इंदापूर पोलिसांनी या घटनेबाबत १२ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राउत हे करीत आहेत.