अख्तर काझी
दौंड : दौंड मधील सुरज क्रीडा मंडळाने राज्य पातळीसाठी कबड्डी खेळणारे अनेक दिग्गज खेळाडू घडविले. आणि दौंडची ही परंपरा पुन्हा अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी सुरज क्रीडा मंडळ पुन्हा एकदा सरसावले आहे आणि त्यांना साथ मिळाली आहे भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांची.
दौंड च्या खेळाडूंनी पुन्हा एकदा कबड्डी खेळ सुरू करून राज्य पातळीवर आपला दबदबा निर्माण करावा आणि दौंडचे नाव उज्वल करावे हा उद्देश समोर ठेवून भीमथडी शिक्षण संस्थेच्या शेठ ज्योती प्रसाद विद्यालय प्रशालेने यासाठी कबड्डी मैदान उपलब्ध करून दिले आहे. या मैदानाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. सुरज क्रीडा मंडळ व शेठ ज्योती प्रसाद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोविंद अग्रवाल, सुरज क्रीडा मंडळाच्या सचिव अनिता काळे, अशोक सुळ, सावता नवले उपस्थित होते.
जर तुम्ही चांगले खेळाडू असाल तर जग तुमच्याकडे चालून येईल तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे युवा वर्गाने खेळांमध्ये आवर्जून सहभाग घेतला पाहिजे असा मोलाचा सल्ला प्रेमसुख कटारिया यांनी यावेळी दिला. राज्य पातळीवरील असंख्य खेळाडू घडविणारे सुरज चे काळे सर यांच्या कार्यांना व आठवणींना कटारिया यांनी उजाळा दिला.
यावेळी शे.जो. विद्यालय व कटारिया हायस्कूल( काळेवाडी) या दोन संघांमध्ये कबड्डीचा सामना खेळविला गेला. सुरज चे माजी खेळाडू राजू सोनवणे व पुनाजी डोईजड यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली.
माजी राष्ट्रीय कबड्डीपटू अहमद शेख, पीटर फिलिप ,मंजू मैराळ, सुरेश गायकवाड ,दगडू चिंचवले, मिलिंद शिंदे ,निलेश चिंचवले, किरण लबडे अल्ताफ शेख, बाबू वाल्मिकी आदींनी आयोजन केले. सूत्रसंचालन मैराळ यांनी केले. अनिता काळे यांनी प्रास्ताविक तर शितोळे सरांनी आभार मानले.