अख्तर काझी
दौंड : शहरातील सर्वच समाज बांधवांनी आपल्या लाडक्या गणेशाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. दि.7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याच पवित्र दिवसांमध्ये,दि.16 सप्टेंबर रोजी समस्त मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान प्रेषित हजरत मो. पैगंबर जयंतीचा दिवसही आलेला आहे.
जयंती निमित्ताने मुस्लिम बांधव शहरातून मिरवणूक (जुलूस) काढून जयंती साजरी करतात. दि.17 रोजी गणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान पैगंबर जयंती सुद्धा आल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनावर जास्तीचा ताण पडू नये तसेच येथील हिंदू- मुस्लिम भाईचारा कायम ठेवण्यासाठी पैगंबर जयंती दोन दिवस उशिरा म्हणजेच दि. 18 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय येथील मुस्लिम बांधवांनी एकमताने घेतलेला आहे.
येथील आलमगीर मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार, अकबर इनामदार, मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, इसामुद्दीन मण्यार, मतीन शेख ,शौकत सय्यद ,अज्जू सय्यद ,फिरोज तांबोळी यांनी दौंडचे प्रभारी पो. निरीक्षक राजेश रामगरे यांची भेट घेत आपला निर्णय कळविला. पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे स्वागत करीत कौतुकही केले. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस निरीक्षक राजेश रामगरे व सहा. पो. फौजदार पांडुरंग थोरात यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या वर्षी सुद्धा गणेश विसर्जनाच्या दिवशीच पैगंबर जयंती (मुस्लिम बांधवांचा सण) दिवस आलेला होता. त्यावेळी सुद्धा येथील मुस्लिम बांधवांनी दुसऱ्या दिवशी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी सुद्धा तोच योग आल्याने मुस्लिम बांधवांनी आपला सण दोन दिवस उशिरा साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनासह सर्वांनीच स्वागत करीत कौतुक केले आहे.