दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी सचिवांना फुटला घाम, आ. कुल म्हणाले थोडं दमानं घ्या

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची 20 वी सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र यावेळी शेतकरी सभासदांनी संस्थेच्या मागील काळातील कामकाजाबाबत सचिवांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने त्याची उत्तरे देताना संस्थेच्या सचिवांना घाम फुटल्याचे पहायला मिळाले. सचिवांची अडचण समजून घेऊन आमदार राहूल कुल यांनी सचिवांची बाजू सावरताना, अश्या प्रकारच्या जनरल सभेची सचिवांना बहुतेक सवय नसावी अशी मिश्किल टिप्पणी केली आणि शेतकरी सभासदांनी सुद्धा सचिवांना थोडे दिवस समजून घ्यावे आणि नव नियुक्त संचालक मंडळ यांचीही कामाची घडी बसेपर्यंत सर्वांनी सहकार्य करून थोडं दमानं घ्यावं असे आवाहन केले.

आमदार राहुल कुल यांनी आपल्याला अध्यक्षीय भाषणामध्ये ही पहिलीच जाहीर सभा असल्याचे सांगत संस्था नावारूपाला यावी यासाठी मागील काळात प्रयत्न झाले नाहीत असे सांगितले. तर भीमा पाटस कारखान्याच्या सभेत ज्यांना दगड मारले त्यांचाच फोटो छापले नाही म्हणून काहींनी मोर्चा काढला याचा पुनरूच्चार करत माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टीका केली.
कारखान्यात अगोदर काय झालं आणि नंतर काय झालं, या मार्केट कमिटीत सुद्धा काय झाले हे सर्वांनी पाहिले असल्याचा उल्लेख केला. तसेच भविष्यात मार्केट कमिटीचे काम योग्य पद्धतीने नियोजन व कायदे पाळून करावे लागेल तरच मार्केट कमिटी व्यवस्थित चालेल असा सल्ला संचालकांना दिला आणि झाकलेलं कामकाज उघडं करून चालवीन्याच्या सूचना संचालकांना केल्या.

जनरल मिटींगला सन्मान, सत्कार टाळावे, फटाके टाळावेत, परवाने काढून सर्व व्यापार सुरु राहावा. मार्केट कमिटीत सर्व सुख सुविधा असाव्यात अश्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.
तर तालुक्यात लवकरच प्रांतकार्यालय सुरु होईल, जिल्हा न्यायालय सुरु होईल. पाण्याचे नियोजन करून पिके जगवली जातील. जे काही कामकाज होईल ते नियमात होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

सभेचे कामकाज सुरु आणि शेतकऱ्यांचा सचिवांना सवाल..

सभेच्या सुरुवातीला सभापती गणेश जगदाळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सभेचे सूत्रसंचालन अशोक फरगडे यांनी तर
विषय पत्रिकेचे वाचन सचिव मोहन काटे यांनी केले. विषय वाचन करताना काटे यांना शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांनी घेरले त्यावेळी आमदार राहुल कुल यांनी शेवटी मध्यस्ती करत त्यांना थोडं समजून घ्या असे सांगितल्याने शेतकऱ्यांचा आक्रमकपणा कमी झाला.

सचिवांनी सभेपुढील विषय वाचन करताना मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे या विषयवार अशोक हंडाळ यांनी आक्षेप घेत मागचे प्रोसेडींग नक्की काय आहे हे पण आमच्या लक्षात आले पाहिजे असा सवाल उपस्थित केला. त्यास सचिवांनी उत्तर देताना मागच्या वर्षी प्रशासक मंडळ असल्याचे सांगून त्यांचे समाधान केले. यावेळी सचिव काटे यांनी बाजार समितीच्या 31/03/2023 अखेर उत्पन्न खर्च व ताळेबंदची माहिती देताना बाजार समितीचे उत्पन्न 1 कोटी 50 लाख 33 हजार 479 रुपये 63 पैसे उत्पन्न मिळाले असल्याचे सांगितले व याची खर्च बाजू मांडताना सभासद खर्च 1 लाख 27 हजार 160 रुपये, अस्थापना खर्च 51 लाख 39 हजार 793 रुपये, प्रशासकीय खर्च 48 लाख 74 हजार 263 रुपये 9 पैसे असा एकूण खर्च 1 कोटी 1 लाख 41 हजार 216 रुपये 9 पैसे असे सांगितले.

साहेबराव वाबळे यांनी गुऱ्हाळ चालक, व्यापारी हे गूळ घेतात मात्र अनेकवेळा शेतकऱ्यांच्या पैशाला कोणी वाली राहत नाही, त्यांची फसवणूकही होते, त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी सूचना केली. यावेळी अतुल ताकवणे यांनी याबाबत माहिती देताना दादांच्या मार्गदर्शनाखाली यावर योग्य ती उपाययोजना अमलात आणली जाणार असल्याचे सांगितले तर सभापती गणेश जगदाळे यांनी प्रश्नाला उत्तर देताना मार्केट कमिटीचे कामकाज स्वच्छ आणि सुरळीत चालण्यासाठी 20 कामगारांची कामगार भरती केली जाणार असून मुख्य ठिकाणी टोल उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अतुल ताकवणे यांनी कांदा मार्केट बाबत प्रश्नावर उत्तर देताना, येत्या एक वर्षांत फळ, फुल आणि कांद्याचे मोठे मार्केट उभे करण्याचे प्रयोजन असल्याचे सांगितले. उमेश म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांसाठी ‘कृषी भूषण पुरस्कार’ देण्यात यावा असे सुचविले त्यावेळी स्व.सुभाष अण्णा कुल यांच्या नावाने पुढील वर्षापासून कृषी भूषण पुरस्कार सुरु करण्यात येईल अशी माहिती अतुल ताकवणे यांनी दिली.

काँग्रेसचे विठ्ठल दोरगे यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तसेच लिलाव प्रक्रिया एक वर्षाने होते की पाच वर्षांनी असा प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना लिलाव प्रक्रिया एक वर्षाने पार पाडली जाते असे उत्तर देण्यात आले.

मानसिंग शितोळे यांनी, ही पहिलीच जाहीर सर्वसाधारण सभा असल्याचे आणि अशी सर्वसाधारण सभा झालीच नसल्याचे सांगत या अगोदर फक्त सहल निघायची आणि सभा संपन्न होत असायची असा खुलासा केला. यावेळी किरण देशमुख यानी बाजार समितीच्या उर्वरित जागेचा विषय उपस्थित करून बाजार समितीची जागा ताब्यात घेण्यात यावी अशी सूचना मांडली.

या सभेला आमदार राहुल कुल, भीमा पाटसचे व्हा. चेअरमन नामदेव बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, सचिव मोहन काटे, संचालकांमध्ये पोपटराव ताकवणे, गजिनाथ आटोळे, संतोष आखाडे, सचिन शेळके, बापूसाहेब झगडे, भारत खराडे, वर्षा मोरे, गीतांजली शिंदे, जीवन मेत्रे, बाळासाहेब शिंदे, अतुल ताकवणे, राहुल चाबुकस्वार, अशोक फरगडे, सुनील निंबाळकर, कालिदास रुपनवर हे उपस्थित होते.

तर शेतकरी सभासदांमध्ये नीलकंठ शितोळे, साहेबराव वाबळे, मानसिंग शितोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, तानाजी दिवेकर,अशोक दिवेकर, गोरख दिवेकर, आप्पासाहेब हंडाळ, अशोक हंडाळ शेतकरी सभासद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन अशोक फरगडे यांनी तर प्रास्ताविक सभापती गणेश जगदाळे यांनी केले. आलेल्या सर्व शेतकरी सभासदांचे आभार संचालक अतुल ताकवणे यांनी मानले.