अख्तर काझी
दौंड : उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचे आश्वासन दिल्याने नातलगांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
काय आहे प्रकरण… दौंड मध्ये एका विवाहितेने, पती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला व मारहाणीला वैतागून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. श्वेता रोहित ओव्हळ(रा. बंगला साईड, दौंड) असे आत्महत्या केलेल्या पीडितेचे नाव असून याप्रकरणी पद्मा गणेश जाधव (रा.गोवा गल्ली ,दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी पती रोहित रवींद्र ओव्हळ सह रोहन रवींद्र ओव्हळ, रितू रवींद्र ओव्हळ, रमा रवींद्र ओव्हळ व राणी वसंत जाधव (सर्व रा. बंगला साईट, दौंड) यांच्या विरोधात भा. द. वी. 306 (पीडित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त करणे), 498 (पीडितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ करणे) 316 (गर्भाशयातील अभ्रकाच्या मृत्यूस कारणीभूत) तसेच भा. द. वी. 304(ब), 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 20 डिसेंबर रोजी रात्री 10 वा. सुमारास घटना घडली. श्वेता हीने दि. 5 जुलै 2021 रोजी रोहित याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तीन महिने सासरकडील लोकांनी तिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर श्वेता माहेरी आली असता तिने घरच्यांना सांगितले की, पती रोहीत, दीर रोहन, सासु रमा, रितू व आत्ते सासू राणी जाधव हे मला कोणत्याही कारणावरून अपमानित करतात. तसेच पती मला म्हणतो की, आपण प्रेम विवाह केल्याने मला लग्नात काही मिळाले नाही, मान मिळाला नाही याचा मला पश्चाताप होत आहे. त्यामुळे तुझ्या आईकडून व भावाकडून आम्हाला नवीन घर घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये व मला सोन्याची अंगठी करायला सांग असे म्हणून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पती व सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाण व छळामुळेच श्वेता हिचा जीव गेला आहे, त्यामुळे श्वेताने आत्महत्या केली नसून तिला सासरच्या लोकांनी मारले आहे असा आरोप श्वेताच्या नातलगांकडून करण्यात येत आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी करीत नातंलगांनी श्वेताचा मृतदेह थेट पोलीस स्टेशन आवारातच आणून ठेवला. त्यामुळे वातावरण चांगलेच गंभीर बनले होते. परंतु पोलीस स्टेशनला उपस्थित असलेले सहा. पो.निरीक्षक तुकाराम राठोड यांनी पीडीतेच्या नातलगांशी संवाद साधून त्यांना संयम बाळगण्याचे सांगितले व त्यांच्या मागणीप्रमाणे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे पीडितेचे नातलग व त्या ठिकाणी जमलेला जमाव थोडासा शांत झाला.
दरम्यान घटनेची खबर मिळताच दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे पोलीस स्टेशनला आले. यावेळी पीडितेच्या नातलगांनी स्वप्निल जाधव यांच्यासमोर आपली व्यथा मांडली व आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. यावेळी स्वप्निल जाधव यांनी श्वेताच्या नातलगांना व जमलेल्या जमावाला शांततेचे आवाहन केले. व या प्रकरणाचा तपास मी स्वतः करणार आहे, प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल व त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करून महिनाभरात आरोप पत्र दाखल केले जाईल असा शब्द स्वप्निल जाधव यांनी दिल्याने नातलगांनी श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला व वातावरण काहीसे शांत झाले.