‛मुंबई’ च्या रफिक तांबोळी प्रकरणात ‛दौंड’ चे नाव आल्याने मोठी खळबळ ! खून, घातपात की आणखी काय? निखिल वागळे, प्रमोद मुजुमदार यांनी प्रकरण उचलल्याने प्रकरण तापले

पुणे : कुर्ला (मुंबई) येथे छोटी मालवाहतूक गाडी चालवून आपल्या कुटुंबासाठी रोजीरोटी कमावणाऱ्या रफिक तांबोळी (Rafiq Tamboli Missing) हा गेल्या दोन वर्षांपासून गायब आहे. 2021 साली त्याचा टेम्पो दौंड येथील काही कार्यकर्त्यांनी पकडला आणि त्यांनतर रफिक तांबोळी याचा काहीच तपास लागला नाही. त्याच्या सोबत नेमके काय झाले आणि त्याचे काय झाले हे गूढ अजूनही कायम आहे. या प्रकरणात आता सलोखा संपर्क गटाचे प्रमोद मुजुमदार आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लक्ष घातले असल्याने रफिक तांबोळी प्रकरणात संशयाची सुई आता दौंडमध्ये येऊन थांबली आहे.

प्रमोद मुजुमदार आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी शेअर केलेल्या या प्रकरणाचा उलगडा करताना, जून 2023 मध्ये नाशिक जिल्ह्यात दोन मॉबलिंचींगच्या (mob lynching) घटना घडल्या होत्या. त्यापैकी एका घटनेत कुरेशी नगर कुर्ला (पूर्व) येथील अफान कुरेशी हा बळी पडला होता. तर त्याच्याबरोबर असलेला नासिर कुरेशी हा गंभीर जखमी झाला होता. त्याचप्रमाणे इगतपुरी जवळील घोटी येथे आणखी एका प्रकरणात भिवंडी जवळील पडघा येथील लुकमान अन्सारी या गरीब टेम्पो ड्रायव्हरची गोमांस वाहतुकीच्या संशयावरून मोबलींचींगद्वारे हत्या केल्याचे पुढे आले होते. या दोन्ही घटनांत बळी पडलेल्या मुस्लिम तरुणांच्या कुटुंबीयांची सलोखा संपर्क गटातर्फे भेट घेण्यात आली होती. कुरेशी नगर मधील भेटीत असेही समजले की अशाच प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मात्र त्यांची कोणी दखल घेतलेली नाही. कुरेशी नगर कुर्ला मधील भोला कुरेशी यांनी काही दिवसांनी परत एकदा सलोखा संपर्क गटाशी संपर्क साधला आणि दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत रफिक तांबोळी हा कुरेशी नगरमधील तरुण ड्रायव्हर चा किस्सा कथन करत रफिक तांबोळी याची पत्नी आज अतिशय बिकट अवस्थेत आहे. तुम्ही सलोखातर्फे तिला कोणत्या प्रकारची मदत करू शकता असा त्यांनी प्रश्न केला.

रफिक तांबोळी याचे संशयास्पद गायब होण्याचे गूढ!

रफिक तांबोळी आणि रेश्मा तांबोळी हे कुरेशी नगर वस्तीत राहणारे कुटुंब. त्यांना दोन लहान मुले आहेत. मुलगा बारा वर्षाचा हुसेन आणि मुलगी दहा वर्षाची झीनत. रफिक तांबोळी व्यवसायाने ड्रायव्हर होते. स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर ड्रायव्हिंग करायचे. 3 जून, 2021 रोजी कुरेशी नगर वस्तीतील कुरेशी नामक म्हशी आणि रेड्याच्या मटणाचा व्यापार करणाऱ्या एका व्यावसायिकाने रफिक तांबोळी यांना आपल्या मटणाच्या टेम्पोसाठी ड्रायव्हिंग करण्याची गळ घातली. रफिक तांबोळी ड्रायव्हिंगला जाण्यास तयार नव्हते. कारण या मटण वाहतुकीत धोका होता. काही गावगुंड आणि स्वयंघोषित कार्यकर्ते रेडा म्हशीचे मटण असतानाही टेम्पो आडवून त्रास देतात. म्हणून रफिक तांबोळी नकार देत होते. परंतु कुरेशी यांनी आग्रह केल्यामुळे /गळ घातल्यामुळे रफिक तांबोळी त्या दिवशी टेम्पो घेऊन दौंड च्या एका कत्तलखान्यातून मटण आणण्यासाठी गेला होता.

चार जून 2021 रोजी सकाळी सात, आठ वाजेपर्यंत टेम्पो परत येणे अपेक्षित होते. मात्र टेम्पो परत आला नाही. पुढे दोन दिवस रफिक तांबोळी परत येतील म्हणून रेशमा तांबोळी त्यांची वाट पाहत होत्या. त्यांनी टेम्पोचा मालक कुरेशी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा टेम्पो बरोबर गेलेला रफिक यांचा साथीदार परत आला आहे आणि रफिकही परत येतील असे कुरेशी यांनी त्यांना सांगितले .प्रत्यक्षात रफिक तांबोळी परतला नाही. तेव्हा पुन्हा एकदा रेश्मा तांबोळी कुरेशी यांच्या दुकानात जाऊन कुरेशी यांच्याबरोबर चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करण्यात गेल्या. त्यावेळेस रफिक तांबोळी बरोबर केलेला कुरेशी यांच्या दुसऱ्या नोकराला पोलिसांनी बोलावले. त्यांनी सांगितले की दौंड जवळ त्या दिवशी रात्री साडेदहा वाजता त्यांचा टेम्पो अडवला गेला. त्यावेळेस हा नोकर पळून आला आणि रफिक तांबोळी ही पळून गेला असावा असे त्याला वाटले. थोडक्यात प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर तीन-चार दिवसांनी रेशमा तांबोळी यांना आपला नवरा गायब झाल्याचे समजले होते.

चुनाभट्टी पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दौंड पोलीस स्टेशनला रफिक तांबोळी हरवल्याची तक्रार दाखल करणे आवश्यक होते. कुरेशी यांनी रेश्मा तांबोळी यांना पुण्याला नेले. मात्र कुरेशींनी रेश्मा तांबोळी यांना दौंड पोलीस स्टेशनला नेले नाही. तर ते तिथे स्वतः एकटे गेले. तक्रार नोंदवली आहे असे सांगितले. कुरेशी लक्ष देत नाहीत म्हणून रेश्मा तांबोळी आपल्या दोन लहान मुलांना घेऊन थेट दौंड पोलीस स्टेशनला पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या नवऱ्याची हरवल्याची नोंद केली. त्यावेळेस पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्ही तपास करतो आणि कळवतो. त्याचवेळी असेही समजले की एका दलाशी संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्याचे निवेदन पोलिसांनी या संदर्भात नोंदले होते. त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले होते की ‘त्या दिवशी दुपारी पाच वाजता या कार्यकर्त्याला रफिक तांबोळी यांचा टेम्पो मटण घेऊन निघाला असल्याचे समजले होते. या टेम्पोत गोमांस आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो अडवला होता. मात्र एका दलाच्या लोकांनी टेम्पो अडवल्याचे पाहून टेम्पोचा ड्रायव्हर घाबरून पळून गेला. पुढे त्याचे काय झाले हे आम्हाला कळले नाही, असे या निवेदनात म्हटले होते.

त्यानंतर रेशमा तांबोळी यांनी आपल्या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी स्वतःच्या पैशातून रफिक तांबोळी यांचा फोटो छापून त्याची पोस्टर्स तयार केली. आपल्या दोन लहान मुलांना घेऊन रावणगाव, दौंड या परिसरात ही पोस्टर्स लावली. रेशमा तांबोळी यांना कोणीही मदत करत नव्हते. त्या एकट्या आपल्या मुलांना घेऊन रस्त्याच्या कडेला रात्री झोपून दिवसभर ही पोस्टर्स लावत होत्या .मात्र या सर्व प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही आजतागायत रफिक तांबोळी याचा पत्ता लागलेला नाही. एकूण उपलब्ध माहितीनुसार रफिक तांबोळी जिवंत असतील की नाही याची शाश्वती देता येत नाही.

रफिक तांबोळी प्रकरणाची मराठी प्रसार माध्यमात कुठेही फारशी वाच्यता नाही किंवा त्यावर चर्चा नाही. अलीकडेच अल जजिरा या वृत्तवाहिनीवर या प्रकरणाची माहिती एम एन पार्थ यांनी नोंदवली आहे. गेली दोन वर्ष अत्यंत हतबल अवस्थेत रेशमा तांबोळी आपल्या मुलांसह जगत आहेत. कुर्ला येथे अतिशय लहान जागेत आपली दोन मुले आणि दीर (अंध) यांच्यासह राहतात. दिवसभर कुरेशी नगर वस्तीत कांदे बटाट्याचा धंदा करतात. त्यांना दिवसाला साधारणपणे 200 रुपये इतकी कमाई होते. एकूणच रेश्मा तांबोळी यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सलोखा संपर्क गटातर्फे त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली जाईल असे ठरवले आहे.
या भेटीच्या वेळेस कुर्ला परिसरात मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर काम करणारी स्थानिक संस्था आवाज – ए निस्वाॉं या संस्थेच्या यास्मिन हजर होत्या .त्यांनीही रेशमा तांबोळी यांच्याशी त्यांच्या संस्थेतर्फे संपर्क ठेवून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
(माहिती : प्रमोद मुजुमदार)
(सर्व फोटो : संदेश भंडारे)

या संपूर्ण प्रकरणात रफिक तांबोळी याचे काय झाले आणि त्याबाबत पोलिसांनी काय तपास केला याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तो पळून गेला म्हणतात तर मग अजून तो घरी कसा आला नाही? आपल्या चिमुकल्यांना भेटायला दोन वर्षात बाप येत नाही यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. दुसरी शंका अशीही वर्तवली जात आहे की, त्याला त्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करून त्याचे बरे वाईट तर काही करण्यात आले नाही ना, आणि जर त्याचे त्याचे काही बरे, वाईट झाले असेल तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर केला गेला नाही ना, आणि जर असे असेल तर मग मात्र हे प्रकरण खूपच भयानक असू शकते आणि अशी किती प्रकरणे घडली आणि दाबली गेली असावीत का असाही प्रश्न वरील प्रकरणावरून उपस्थित होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago