दौंड : शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावी व येथील सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहराबाहेरचा रस्ता दाखवून शहर गुन्हेगारी मुक्त करून सफाई करणार आहे, या कामांमध्ये येथील पत्रकारांसह दौंडकर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पो. निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले. 2017 साली भाऊसाहेब पाटील यांना पोलीस महासंचालक विशेष सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले होते.
दौंड चे पो. निरीक्षक म्हणून पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे, त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून शहराबद्दलची व समस्यांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी उपस्थित होते.पाटील यांनी सन 1999 च्या बॅचमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे.23 वर्ष ते पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली सह सोलापूर शहरात त्यांनी आपले कर्तव्य बजाविले आहे.
शहरातील काही भागातील वाढती गुन्हेगारी, रोड रोमिओंकडून मुलींना होणारा त्रास , येथील घरफोडी, दरोड्यांचे रेंगाळलेले तपास तसेच शहरातील इतर समस्यांबाबतची माहिती पत्रकारांनी यावेळी पाटील यांना दिली.
पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलीस प्रशासनाकडून जनतेला नाहक त्रास होणार नाही व पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितपणे न्याय देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत व चेहरे बघून कारवाई होणार नाही हे पक्के. शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी अशा वाहनांची वाहतूक शहरा बाहेरूनच होण्यासाठी उपाय योजले जाणार. शहरातील काही ठिकाणी मुलींना रोड रोमिओचा त्रास आहे हे लक्षात घेता अशा टवाळ खोरांचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल. शहर व परिसरामध्ये रात्रीची गस्त वाढवून कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे.
दौंड मध्ये नव्याने झालेल्या कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये लूटमारीच्या घटना घडत आहेत त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळेतील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार गस्त ठेवली जाऊन, या ठिकाणी लूटमार करणाऱ्यांना कायद्याची जरब बसेल अशी कारवाई करणार असल्याचे पाटील म्हणाले. शहर चांगले आहे आणि ते चांगलेच ठेवण्यासाठी आम्ही करत असलेल्या कामांमध्ये दौंडकर आम्हाला सहकार्य व सहाय्य करतील अशी अपेक्षाही भाऊसाहेब पाटील यांनी व्यक्त केली.