दौंड : दौंड शहरात भीमसैनिकांनी 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा केला. 1 जानेवारी 1818 या दिवशी 500 शूरवीर सैनिकांनी 28 हजार पेशवाई सैन्याचा पराभव करून भारताला जात मुक्त आणि लोकशाहीवादी बनवण्याच्या दिशेने पहिले ऐतिहासिक पाऊल टाकले होते. हा इतिहास जिवंत रहावा म्हणून या शूरवीरांचा विजय स्तंभ भीमा कोरेगाव येथे उभारण्यात आला आहे अशी माहिती भीम सैनिकांनी यावेळी दिली. भीमा कोरेगावच्या या संघर्षाची, यशाची, शौर्याची प्रेरणा सध्याच्या युवा पिढीने घ्यावी व तो संघर्ष, विजय कायम स्मरणात ठेवावा या उद्देशाने दौंड बहुजन समाज पार्टीच्या वतीने येथील डॉ.बाबासो. आंबेडकर चौकात विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. डॉ. बाबासो. आंबेडकर यांच्या स्मारकास व या विजय स्तंभास पुष्प अर्पण करीत भीमसैनिकांनी शूर वीरांना अभिवादन केले.