अब्बास शेख
पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्लॉटिंगचा व्यवसाय पुन्हा एकदा जोमात सुरू झाला आहे. कागदपत्रांची माहिती नसलेल्या हजारो नागरिकांची यामुळे मोठी फसवणूक होत आहे. हे प्रकार सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांत जास्त प्रमाणात घडत आहेत.
बेकायदेशीर आणि अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या कंपन्या तसेच जमीन मालकांकडून घर बांधण्यासाठी जागा शोधत असणाऱ्या नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून या जागा विकल्या जात आहेत. या शेत जमिनी अकृषिक (NA) न करता त्या लोकांना बेकायदेशीर रित्या विकल्या जात आहेत. बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्यामध्ये दौंड, हवेली, पुरंदर, भोर हे तालुके अग्रेसर असून अनाधिकृतरीत्या प्लॉटिंगची विक्री ही एक प्रकारे जागा विकत घेणाऱ्या लोकांची फसवणूक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा या जागांना अधिकृत रस्ते नसतात मात्र थोडे दिवस 30 फूट किंवा अंतर्गत 20 फूट रस्ता दाखवला जातो, काहीवेळा जमिनीचा झोन वेगळा असतो त्यामुळे त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंठेवारी बंद असल्याने संबंधित जागेचे खरेदीखतही होत नाही. तरीही बेकायदेशीरपणे गुंठेवारी पद्धतीने खरेदीखत केले जाते आणि या सर्व गोष्टींची ग्राहकांना माहितीही दिली जात नाही.
11 जणांचा ग्रुप करून केले जाते खरेदीखत – तुकडा बंदी कायदा करण्यात आला असताना बेकायदेशीर रित्या 11 जणांचा ग्रुप केला जातो आणि त्यांचे खरेदी खत केले जाते. जर सब रजिस्ट्रार ने असले प्रकार करण्यास नकार दिला तर 11 जणांची सोसायटी किंवा ट्रस्ट करून त्याचे खरेदी खत केले जाते ज्यावर हे सर्वजण संचालक म्हणून घेतले जातात. हे सर्व प्रकार शासनाच्या त्या धोरणाच्या विरुद्ध असून त्यामध्ये त्यांनी तुकडा बंदी कायदा करून शेत जमिनीचे तुकडे होणार नाहीत यावर लक्ष केंद्रित केले होते.
प्लॉट घ्यायचेच असतील तर अधिकृत घ्या.. ज्याचं नाणं खणखणीत असतं त्याला भीती नसते मात्र ज्याचं नानचं खोटं असतं त्याला अनेक पळवाटा शोधाव्या लागतात हे कुणीही नाकारणार नाही, त्यामुळे नागरिकांनी आकृषिक NA किंवा बांधकाम करण्यास परवानगी मिळेल असे प्लॉट घेऊन त्यावर आपले स्वप्नातील घर अस्तित्वात आणावे. इतर हक्कात किंवा NA नसलेल्या जमिनी घेऊन कायमचा पश्चाताप करून घेण्यापेक्षा थोडे जास्त पैसे जाऊन हक्काचा प्लॉट घेतलेला कधीही फायद्याचा ठरतो यात शंका नाही.
महत्वाची माहिती – दिनांक 12 जुलै 2021 चे तुकडे बंदी परिपत्रक 2022 औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे आता जमीन च्या तुकड्याची किंवा गुंठेवारीच्या नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्हाला करता येतील असे काही प्लॉट धारकांकडून भासवले जाते मात्र या दस्तांची सातबाराला नोंद करताना मात्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा विचारात घेतल्याशिवाय अशी नोंद सातबाराला होऊ शकणार नाही म्हणजे अशा गुंठेवारीच्या दस्तऐवजाची सातबाराला नोंद होणार नाही.
त्यामुळे आधारभूत क्षेत्रापेक्षा कमी खरेदी केलेल्या जमिनीची, तुकड्यांची नोंदणी झाली आहे असे समजून त्याच्या आधारे जमिनीवर बांधकाम केलं तर ते महाराष्ट्र तुकडाबंदी कायदा अंतर्गत अनधिकृत ठरण्याची शक्यता जास्त आहे.