दौंड : दौंड तालुक्यात राजकीय वातावरण तप्त झाले आहे. माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यात काटे की टक्कर पहायला मिळत आहे. काल वरवंड येथे झालेल्या सभेमध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी कारखाना मुद्द्यावर बोलताना तालुक्यात सत्ता आली तर भीमा पाटस कारखान्याबाबत सर्वजण एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभेचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ वरवंड येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी तालुक्याचा विकास करण्यासाठी आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन केले. आलेल्या अनेक वक्त्यांनी विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर टिका केली. तर आप्पासाहेब पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आपण सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीला या तालुक्यातून २६ हजारांचे लीड दिल्याचे सांगितले.
सध्या दौंड तालुक्यात कुल विरुद्ध थोरात असा सामना पहायला मिळत आहे. एकीकडे विकासाचे मुद्दे मांडले जात आहेत तर दुसरीकडे भावनिक आवाहन करून निवडून द्या असे आवाहन केले जात आहे त्यामुळे दौंड तालुक्यातील जनता काय निर्णय घेते हे येत्या वीस तारखेला मतदान होऊन तेवीस तारखेला होणाऱ्या मत मोजणीनंतर समजणार आहे.
भीमा पाटस कारखाना प्रचाराच्या केंद्रस्थानी का..? विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्याऐवजी भीमा पाटस कारखान्यावर जास्त बोलले जात आहे. तालुक्याच्या आजूबाजूला असलेले आणि बंद पडलेले शिरूर चा घोडगंगा सहकारी साखर कारखाना तसेच थेऊर चा यशवंत सहकारी साखर कारखाना याबाबत मात्र कोणी बोलताना दिसत नाही आणि ते कारखाने पुन्हा सुरु करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत हेही सांगितले जात नाही. मात्र त्या उलट भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा सध्या जोमात सुरु असून याचा मोठा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. टिका करण्यासारखे कोणतेही ठोस मुद्दे विरोधकांकडे नसल्याने कारखान्यावर टिका केली जात असल्याचा आरोप कुल गटाकडून केला जात आहे.