पुणे : समाजात प्रत्येक ठिकाणी चांगल्या, वाईट दोन्ही प्रवृत्ती आढळून येतात. कुणी समाजकार्य करतो तर कुणी समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो. असाच काहीसा प्रकार व्यवसायामध्ये पहायला मिळतो. कुणी व्यवसाय करताना नुसता स्वतःचा फायदा न पाहता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतो तर कुणी मात्र फक्त आपला फायदा करण्यासाठी ग्राहकांना वेठीस धरत असतो.
असा प्रकार सध्या रिक्षा, टॅक्सी चालविणाऱ्या काही चालकांमध्येही पहायला मिळत असून चुकीच्या पद्धतीने ग्राहकांशी वागणाऱ्या, त्यांना वेठीस धरणाऱ्या आणि जास्त भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरुद्ध आता थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून एक व्हाट्सअप्प क्रमांक आणि ईमेल देण्यात आला आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याबाबत तक्रार ९९२०२४०२०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर व [email protected] ई-मेलवर करावी, असे आवाहन मुंबई (पश्चिम) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस काही रिक्षा, आणि टॅक्सी चालकांकडून प्रवाश्यांना जास्त भाडे आकाराने, त्यांच्याशी गैर वर्तणूक करणे, भाडे नाकारणे अश्या विविध तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने प्रशासनाने आता यावर कारवाई करण्यासाठी व्हाट्सअप्प नंबर आणि ई-मेल आयडी प्रसिद्ध केला असून प्रवाश्यांना आता यावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.