अब्बास शेख
पुणे – दौंड चे आमदार राहुल कूल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी अगोदर तीन महत्वाच्या कामांवर जोर दिला होता आणि ती कामे जवळपास मार्गी लागली होती मात्र राज्यात 2019 ला सत्ता बदल झाला आणि ती तिन्ही कामे रेंगाळली होती. आता मात्र पुन्हा सत्ता बदल होण्याची चिन्हे दिसत असून असे झाले तर दौंड तालुक्यासाठी हि मोठी परवणी ठरेल असे भाकीत वर्तवले जात आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात आणि खासकरून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश आले होते. शरद पवारांच्या पावसाळी लाटेत अनेक दिग्गज पराभूत झाले होते मात्र तरीही त्या लाटेत पुणे जिल्ह्यात एकमेव तरलेली व्यक्ती म्हणजे विद्यमान आमदार ‘राहुल कूल’.
आमदार राहुल कूल यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकून अनेक विकासात्मक धोरणे आखली होती आणि त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून दौंड तालुक्याला भरीव विकास निधी आणण्यात त्यांना मोठे यश आले होते. हे होत असताना त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांच्या योजणांना फलदाई बनवणारा हात त्यांच्या डोक्यावर आला. हि संधी साधून आमदार राहुल कूल यांनी दौंड आणि आसपासच्या तालुक्यांसाठी मुळशी धरणाचे पाणी, चौफुला, देउळगाव, खोर परीसरात उभी राहणारी एम.आय.डी.सी आणि दौंडकरांसाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय या गोष्टींचा पाठपुरावा करून त्या मंजूर करून घेतल्या होत्या.
याबाबत त्यांनी 2019 साली या तीन मुद्द्यांना केंद्रास्थानी ठेऊन तसे काम सुरु केले आणि येणाऱ्या काळात हे काम होणार यावरही शिक्कामोर्तब झाले होते मात्र 2019 साली सेना-भाजप युतीचे सरकार बनता बनता राहिले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे आपसूकच या मुख्य कामांना ब्रेक लागला आणि चौफुला एम आय डी सी, प्रांत कार्यालय, मुळशी धरणाचे पाणी हे विषय रेंगाळले होते. आता मात्र पुन्हा सत्ता बदलाच्या दिशेने वारे वाहू लागले असून जर राज्यात पुन्हा भाजप ची सत्ता आली तर मात्र हि तिन्ही कामे आणि दौंड तालुक्याला कायम चकवत आलेला लाल दिवा मिळेल याबाबत दौंडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तरीही राजकारणात काही सांगता येत नाही त्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका दौंडकरांना ठेवावी लागणार आहे.