IAS in Daund – दौंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, दौंडचे सुपुत्र निलेश गटणे यांची भारतीय प्रशासन सेवेत (IAS) पदोन्नती



|सहकारनामा|

दौंड : दौंडचे सुपुत्र निलेश रमेश गटणे यांची भारतीय प्रशासन सेवेमध्ये(IAS) पदोन्नती झाली आहे. सदर सेवा ही प्रतिष्ठित व जबाबदारीची मानण्यात येते व ती संधी पहिल्यांदाच दौंडकरास मिळाली आहे. निलेश यांचे शालेय शिक्षण दौंड मधूनच झाले असून शालेय जीवना पासूनच प्रथम क्रमांक मिळविणारे म्हणून ते परिचित आहेत. 

सर्वप्रथम केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक व युनियन बँकेत अधिकारी म्हणून निवड झालेले व सण 1996 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्वाधिक गुणांचा विक्रम नोंदवून निलेश हे उपजिल्हाधिकारी पदी प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झाले. कोकण विभागात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी( ठाणे, उपविभागीय अधिकारी), माणगाव -रोहा( प्रांत अधिकारी) सह व्यवस्थापकीय संचालक (चित्रनगरी गोरेगाव,मुंबई), उपायुक्त कल्याण-  डोंबिवली मनपा, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी व प्रादेशिक अधिकारी (एम.आय.डी. सी. पुणे) या या पदांवर यशस्वी व आपली छाप पाडणारे कामकाज केले.

 माणगाव -रोहा येथील लोक सहभागातून शासकीय इमारती व सर्वोत्कृष्ट उपविभाग अशी ओळख आजही टिकून आहे. तसेच चाकण औद्योगिक वसाहती मधील क्लिष्ट जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे व औद्योगिक वसाहत विकसित करण्यात त्यांचे कष्ट आजही स्थानिक विसरत नाहीत. अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाल्यानंतर नागपूर विभागात व त्यानंतर सण 2014 च्या निवडणुकी समयी सह मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द लोकांच्या लक्षात आहे.

 महावितरण कंपनीमध्ये कार्यकारी संचालक व महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे भूसंपादन या प्रक्रियेनंतर सध्या ते कोकण विभागात अध्यक्ष( जिल्हा, जात पडताळणी समिती) पदावर कार्यरत आहेत. निलेश यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे वडील, देवभक्त आई तसेच अंध असूनही जिद्दीने संगणक प्रशिक्षण देणारी बहिण व भाऊ आणि सकारात्मक मित्र मंडळींना दिले आहे. 

भारतीय प्रशासन सेवेत मिळालेल्या सुसंधीचा सामान्य व्यक्तींसाठी उपयोग व्हावा अशी मनोकामना निलेश यांनी व्यक्त केली आहे. दौंड शहरातून त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचे कौतुक होत आहे.