दौंड : चैन करण्यासाठी पैसा आवश्यक आहे, आणि हाच पैसा मिळविण्यासाठी सर्वत्र बेइमानी, भ्रष्टाचार चालू असल्याचे चित्र असताना दौंड येथील ऑल इंडिया एस. सी, एस. टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चे सक्रिय सदस्य नामदेव कसबे यांनी मात्र आजही प्रामाणिकपणा, माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.
कसबे रोज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामधील आश्रय हॉटेलात चहा पिण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे आजही कसबे आश्रय ला चहा पिण्यासाठी आले आणि त्यांना हॉटेल समोरच तब्बल 25 हजार रु सापडले, पैसे घेऊन ते हॉटेलात आले असता इकबाल मलिक( उत्तर प्रदेश) नावाचे ग्रहस्थ आपले हरवलेले पैसे शोधत असताना त्यांनी पाहिले. आपल्याला सापडलेले पैसे मलिक यांचेच आहेत हे कसबे यांच्या लगेच लक्षात आले व त्यांनी मलिक यांना आवाज देत त्यांचे हरवलेले पैसे त्यांना प्रामाणिकपणे परत केले.
परराज्यातून कामासाठी आलेल्या मलिक यांना आपले हरवलेले पैसे मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला. प्रामाणिकपणे पैसे परत करणाऱ्या नामदेव कसबे यांचे आभार मानताना मलिक यांचे डोळे पाणावले होते. पैसाच सर्व काही नसतो, पैशापेक्षा सुद्धा माणुसकी मौल्यवान आहे हे रेल्वे कर्मचारी कसबे यांनी दाखवून दिले. कसबे यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.