मुंबई : कोरोनानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये एका व्हायरसने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चीन मध्ये वेगाने पसरणाऱ्या ह्यूमन मेटानिमो या व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनासारखी महामारी पुन्हा डोके वर काढू नये म्हणून विविध देश आता सतर्क झाले आहेत. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन च्या शेजारील आपला भारत देखील आता सतर्क झाला आहे.
ऐनवेळी कोरोना सारखी भयानक परिस्थिती उद्भवू नये म्हणून भारताने आतापासूनच या व्हायरसच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारत या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असून आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र काही खबरदारी नक्कीच घ्यावी लागणार आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन करताना अफवांपासून सावध राहावे आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. तेलंगणाच्या आरोग्य विभागाने राज्याने श्वसनासंबंधित रुग्णांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून डिसेंबर २०२४ च्या तुलनेत डिसेंबर २०२३ मध्ये या आजाराशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ झालेली नसल्याचे दिसत आहे.
आजारापासून बचावासाठी काय काळजी घ्याल…
खोकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू ठेवावा, हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आजारसदृश्य व्यक्तीपासून अंतर ठेवावे, ताप, खोकला सर्दी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, पाणी भरपूर प्यावे, पौष्टिक भोजन करणे, सर्व ठिकाणी पुरेशे वेंटिलेशन आहे का, हे तपासून घ्यावे, आजारी असल्यास घरात राहावे, आजारी व्यक्तीने दुसऱ्याच्या संपर्कात राहू नये, पुरेशी झोप घ्यावी.
या गोष्टी टाळाव्यात…
हात मिळवण्यापासून दूर राहावे, टिश्यू पेपर किंवा रुमालाचा वारंवार वापर करावा, आजारी लोकांच्या संपर्कात राहू नये, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
चीनमधील या व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुद्धा देखरेख गटाची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून WHO ला परिस्थितीबाबत वेळेवर अपडेट्स शेअर करण्याची विनंती करण्यात आली आहे. भारत श्वासोच्छवासाचे आजार हाताळण्यासाठी तयार असून या आजारांची कोणतीही असामान्य वाढ दिसून येत नसल्याची माहिती मिळत आहे.