अख्तर काझी
दौंड : दौंड कुरकुंभ मार्गावरील गोपाळवाडी हद्दीतील जिजामातानगर परिसरातील कचराकुंडीमध्ये दिनांक 25 मार्च 2025 रोजी 10 बरण्यांमध्ये मानवी अवशेष व एका बरणीमध्ये 18 ते 20 आठवड्यांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. सदरचा प्रताप येथील भंगाळे हॉस्पिटलकडून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते आणि भंगाळे हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांनी ते मान्य सुद्धा केले होते.
याबाबत दौंड पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असून सदरच्या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती. विषय गंभीर असल्याने या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी मा.जिल्हा शल्यचिकित्सक (जिल्हा रुग्णालय, पुणे) यांनी दिनांक 25 मार्च 2025 रोजी प्रत्यक्ष भेट दिली असता, त्यांना या प्रकरणात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. या संदर्भात भंगाळे हॉस्पिटलला खुलासा मागण्यात आला होता.
भंगाळे हॉस्पिटल ने आपला खुलासा पाठविला असता, सदरचा खुलासा असमाधानकारक असल्याचा शेरा जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून मारण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलकडून ॲनाटोमी ॲक्ट (शरीर शास्त्र कायदा) 1949 चा भंग झालेला आहे त्या अनुषंगाने सदर प्रकरणी भंगाळे हॉस्पिटल यांची बॉम्बे नर्सिंग होम्स ॲक्ट, 1949 नोंदणी तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येत आहे असा आदेश करण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलकडून यापुढे अंतर रुग्ण भरती करण्यात येऊ नये याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.