भयंकर : भीमा नदीपात्रात एकूण ‘सात’ मृतदेह सापडले… मृतांमध्ये 3 चिमुरड्यांचा समावेश

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीत पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह सापडले असून या भयंकर प्रकाराने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात काल एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. यात मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा.खामगांव ता.गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत.

हा अपघात आहे, घातपात आहे कि आत्महत्या हे समजू शकले नाही. हा सर्व प्रकार काय आहे हे शवविच्छेदनानंतर उघड होण्यात मदत होणार आहे. एकाच कुटुंबातील 7 लोकांचे मृतदेह पाहून संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे अधिक तपास करत आहेत.