महिला दिनानिमित्त केडगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून पशुपालक महिलांचा सन्मान

अब्बास शेख

केडगाव : जागतिक महिला दिनानिमित्त केडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 केडगाव (ता. दौंड) येथे पशुपालक महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केडगाव परिसरातील अनेक महिला भगिनी आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविलेल्या महिला नेत्यांनी सहभाग नोंदवला.

जागतिक महिला दिनानिमित्त केडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 आणि विरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रा. लि तर्फे पशुसंवर्धन क्षेत्रातील महिलांचे योगदान, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, शेळीपालन, स्वच्छ दूध उत्पादन, इत्यादी विषयावर चर्चासत्र व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पशुपालनात अग्रेसर असणाऱ्या उत्कृष्ट महिला पशुपालकांना यावेळी सन्मानित करण्यात येऊन त्यांना जंत नाशक, गोचीड निर्मूलन औषधंचे मोफत वाटप  करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. चैत्राली आव्हाड, जिल्हा परिषद सदस्या राणीताई शेळके, माजी पंचायत समिती दौंड सभापती मीनाताई धायगुडे, केडगाव सरपंच  पूनम बारवकर, बोरिपार्धी ग्रामपंचायत सदस्य  रोहिणी नेवसे इत्यादी महिला मान्यवर उपस्थित होते. बोरिपार्धी, केडगाव, वाखारी, दापोडी, नाणगाव परिसरातील शेकडो महिला पशुपालकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.