हलाल मटनच विकणार, हिंदू खाटीक व्यवसायिकांचा नितेश राणेंना ‘झटका’

नाशिक : आम्ही हलाल मटनच विकणार आहोत, आम्हाला सर्टिफिकेट देणारे नितेश राणे कोण? असा सवाल नाशिक येथील हिंदू खाटीक समाजाने विचारत आम्ही सर्व हिंदू खाटीक व्यवसायिक हलाल मटनच विकणार आहोत आणि तसा आम्ही निर्णय घेतला असल्याचे नाशिक मधील व्यवसायिकांनी सांगितले आहे.

नीतेश राणे यांनी हलाल मटन विरुद्ध झटका मटन असा पर्याय शोधून काढला आहे. त्या संदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी विधान केले आहे. मात्र आता पिढी परंपरागत खाटीक व्यवसाय करणारे हिंदू खाटीक व्यवसायिकांनी झटका मटनाला विरोध करून, नितेश राणे आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण? असा सवाल उपस्थित करून खाटीक व्यवसाय आमचा आजचा नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीपासूनचा आहे.

नाशिक शहरातील सर्व मटन व्यावसायिकांकडून हलाल पद्धतीचे मटन विकले जाईल, झटका पद्धतीचे मटन आम्ही  विकणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे असे म्हणत आम्ही जन्मजात खाटीक आहोत. खाटीक व्यवसाय आमचा आजचा नाही, तर तो पिढ्यानपिढ्या शेकडो  वर्षांपूर्वीपासूनचा आहे, त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट देणारे नीतेश राणे कोण? असा सवालही नाशिकच्या हिंदू खाटीक समाजातील मटन विक्रेत्यांनी केला आहे.

झटका आणि हलाल यात फरक काय

यावेळी हिंदू खाटीक व्यवसायिकांनी हलाल आणि झटका मटन या विषयी माहिती देताना, वर्षानुवर्षे देशात हलाल पद्धतीचे मटन विकले जाते. तर देशात काही ठराविक ठिकाणी पॉकेटमध्ये झटका पद्धतीचे मटन विकले जाते. पण संपूर्ण देशात बहुतांश ठिकाणी हलाल पद्धतीचेच मटन विकले जाते. कारण झटका पद्धतीचे मटन आपल्याकडे चालतच नाही. शास्त्रीय दृष्टीनेसुद्धा झटका मटन अयोग्य आहे. विजेच्या करंटमुळे त्या प्राण्याच्या नसा गोठल्या जातात. त्यामुळे रक्त प्रवाहीत न होता, ते गोठले जाते. त्यातून विषबाधा होऊ शकते. आरोग्यासाठी घातक ठरू शकते, ते तुम्ही झटकामधून खाता. हलाल पद्धतीमध्ये त्या सर्व गोष्टींचा निचरा होतो. स्वच्छ केलं जातं, असा दावा या व्यवसायिकांनी केला आहे.