केदारनाथ : आज रविवारी दि. १५ जून रोजी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण ७ जण होते आणि या सर्वांचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
हे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिर येथून भाविकांना घेऊन गौरीकुंडला जात होते. मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण (UCADA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर NDRF आणि SDRF बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. अपघातस्थळी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे फक्त जळालेले अवशेष सापडले आहेत. अपघातानंतर हेलिकॉप्टर पूर्णपणे जळाले आहे.