दौंडमध्ये प्रचंड पाऊस.. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप | पहिल्याच पावसात नगरपालिकेच्या ड्रेनेज व्यवस्थेची दाणादाण

अख्तर काझी

दौंड : शहरात रात्री (6 जून) जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि जेमतेम अर्ध्या तासातच शहरात मुख्य चौकातील रस्त्यांच्या कडेला असणारी गटारे तुंबून पाणी रस्त्यावरून धो… धो वाहु लागले. रस्त्यांना अक्षरशः नदी, नाल्याचे स्वरूप आले. शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या ड्रेनेज व्यवस्थेची पावसाने दाणादाण उडाली असल्याचे समोर आले. गटारी तुंबल्याने पाण्याचा पूर्णपणे निचरा झाला नाही आणि त्यामुळेच पाणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात, गोडाऊन मध्ये शिरले व त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालांचे प्रचंड नुकसान झाले.

अशीच काहीशी परिस्थिती झोपडपट्टी प्रभागात पाहायला मिळत आहे, या ठिकाणी सुद्धा गटारी तुंबून पाणी लोकांच्या घरात शिरले असल्याच्या तक्रारी येत आहेत. वास्तविक पाहता पावसाळा सुरू होण्याआधी नगरपालिकेने शहरातील व विशेषतः झोपडपट्टी प्रभागातील नालेसफाई करण्याचे काम करणे गरजेचे होते व ते न झाल्याने अशी विदारक परिस्थिती उद्भवून व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे असे सर्वांचे म्हणणे आहे. पहिल्याच पावसात शहराचे हे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नगरपालिकेला नागरिकांचे आणखीन किती हाल पहायचे आहेत असा सवाल दौंडकर उपस्थित करीत आहेत. आणि या होत असलेल्या परिस्थितीला नक्की कोणाला जबाबदार धरायचे असा सवालही दौंडकर विचारत आहेत. नगरपालिका आता तरी यावर काही ठोस उपाय करणार की नाही?

दौंड मधील व्यापारी वर्ग आणि व सामान्य नागरिकांनी कायमच सहनशीलता दाखवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर स्वतः नागरिकच घाण पाण्यात उतरून तुंबलेली गटारे दुरुस्त करीत असताना दिसत होते. मात्र आता त्या सहनशीलतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा ईशारा आता व्यापारी आणि नागरिकांनी अनेकवेळा देऊन सुद्धा ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या सय्यमाचा बांध फुटण्याची वेळ  आली आहे हे नगरपालिका प्रशासनाने विसरू नये व वेळीच आपल्या कामाला लागावे अशी म्हणण्याची वेळ दौंडकरांवर आली आहे.