बारामतीकर म्हणतात.. आत्ता समजलं ‛राहुलदादांना’ आरोग्यदूत का म्हणतात..!

अब्बास शेख

बारामती : असे म्हणतात की माणसाला माणसाची खरी किंमत त्याच्या वाईट वेळेत समजते. अनेकांना याचा अनुभव त्यांच्यासोबत काही अघटित घडल्यावर, अपघात किंवा आजारी पडल्यानंतर येतो. अशावेळी मदत करण्यासाठी मी मी म्हणणारे आपला हात कसा आखडता घेतात याचा अनुभव अनेकांना आहेच. त्यामुळे अघटित घडून वाईटवेळ आली की आपल्या सोबत रोज उठबस करणारे कसे गायब होतात याचाही अनुभव येतो. मात्र, अश्यावेळी एक व्यक्ती जी तुम्हाला ओळखत असो अथवा नसो, तुमच्यावर वाईट वेळ आली आणि त्यांच्याशी संपर्क झाला की तुम्हाला हमखास मदत होते असा आत्तापर्यंतचा इतिहास असून ती व्यक्ती म्हणजे राज्यात आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे दौंडचे आमदार राहुल कुल..

आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांना जीवनदान मिळालेले आपण ऐकले आणि वाचले आहेच. पण आज बारामती तालुक्यातील सुपे येथे राहणारे श्री. माणिक किसन ढम यांच्याबाबत घडलेला किस्सा तुम्ही वाचला की तुम्हीही तेच म्हणाल जे ते पुढे म्हणाले आहेत..

तर घडलं असं की, माणिक ढम यांचा दि.09/01/2022 रोजी रात्री 8 च्या सुमारास मोरगांव-सुपे रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ढम गंभीर जखमी होऊन त्यांना 2 ते 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही नातेवाईकांनी कसेबसे त्यांना तातडीने पुण्यातील एका प्रसिद्ध खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. ऑपेरशन मोठे व क्रिटिकल होते त्यामुळे ऑपेरशन व इतर औषध मिळून साधारण साडेतीन ते चार लाखापर्यंत खर्च येणार होता व तशी कल्पना हॉस्पिटलने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती.
रुग्णाची परिस्थिति पाहता त्यांचे त्वरित ऑपरेशन गरजेचे होते. त्यामुळे घरची परिस्थिति बेताची असूनही पाहुणे व मित्रांकडुन पैशाची जुळवाजुळव करून काही रक्कम गोळा करण्यात आली.मात्र आता यापुढे त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये भरायला आणखीन काहीच उरले नव्हते. 2 दिवसांनी दौंडचे आमदार राहुल कूल यांना ही गोष्ट नातेवाईकांकडून सांगण्यात आली. त्यानंतर कुल यांनी ढम यांचे नातेवाईक सचिन कदम व संतोष जाधव यांना वेळ देऊन भेटायला बोलावले. हे नातेवाईक त्यांना भेटायला गेल्यानंतर राहुल कुल यांनी त्वरित पुण्यातील त्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये फोन करून बिलाबाबत बोलणी केली व इथून पुढचे बिल भरायची गरज नाही व भरलेल्या बिलाबाबत अजून काही मदत होईल व ती करतो असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ढम यांचे ऑपरेशन झाले व काल म्हणजे दि.18 जानेवारी रोजी रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलने झालेल्या बिलातील 1 लाख रुपये तर कमी केलेच पण भरलेल्या पैशातूनही 25 हजार रुपये रिफंड केले. एका गरीब कुटुंबातील हलाकीच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या व्यक्तीला इतकी मोठी मदत झाल्याचे पाहून रुग्ण आणि नातेवाईक दोन्ही गहिवरले. आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.. “आत्ता समजलं की राहुलदादांना आरोग्यदूत का म्हणतात”