हसन मुश्रीफांच्या घरावर पुन्हा ‘ईडी’ (ED) ची धाड! महिलावर्ग संतप्त, कार्यकर्त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतले

कागल : माजी कामगार, विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडी (ED) ने छापा मारला आहे. आज सकाळी त्यांच्या कागल येथील घरावर हा छापा मारण्यात आला असून मुश्रीफांना मुद्दाम त्रास देण्यासाठी धाड सत्र सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याकडून आरोप करण्यात आलेला असून आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं तो चालवायला घेतलेला होता. या संपूर्ण प्रकरणाची ईडीनं यापूर्वी चौकशी केली होती. आता ईडीकडून पुन्हा एकदा धाडसत्र सुरु करण्यात आले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.

सर्वत्र संताप व्यक्त

हसन मुश्रीफ यांच्या घरावर इडी (ED) ने छापा मारताच येथील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. एका कार्यकर्त्याने या छाप्याच्या निषेधार्थ घटनास्थळी आपले डोके फोडून घेतले आहे. महिला वर्गाने संतप्त होत या कारवाईला सुडबुद्धिची कारवाई म्हटले आहे. तर नाना पटोले, जयंत पाटील यांनी ही कारवाई म्हणजे मुश्रीफांना मुद्दाम मानसिक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांची टिका

सूडबुद्धी आणि मानसिक त्रास देण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. 2024 नंतर जनता यांना रस्त्यावर धुताना दिसेल अशी प्रखर टिका त्यांनी केली आहे. हे घाणेरडे आणि निर्लज्ज पणाचे राजकारण भाजप करत असल्याचेही काही नेत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.