दौंड : पत्रकार हा आणि पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र कधी कधी लोकशाहीच्या याच स्तंभाला बातम्या दिल्या अथवा सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्रास दिला जातो आणि पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करने अथवा त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करने असले प्रकार केले जातात मात्र अश्या प्रकारे गैर कृत्य करणाऱ्यांवर आता पोलिसांनीही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
असाच एक प्रकार दौंड तालुक्यातील पाटस येथे घडला असून पत्रकार राजेंद्र झेंडे यांना शिवीगाळ करून त्यांना त्रास देणाऱ्या आणि त्यांच्या मुद्देमालाचे नुकसान करणाऱ्या पाटस ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच व त्यांच्या पतीसह सुमारे १९ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पत्रकार राजेंद्र सुरेश झेंडे (पाटस, ता.दौंड) यांना त्रास देणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, बेकायदा
जमाव जमवून कोणताही प्रशासकीय आदेश नसताना, कोणताही प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना, कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे दुकान उध्वस्त करून दुकानातील साहित्य व रोख रकमेसह ४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, पत्रकार झेंडे हे एका प्रकरणाची बातमी करण्यासाठी गेले असता आरोपिंनी पत्रकाराच्या जवळ येऊन तू गावाची बदनामी करतोस, खोट्या बातम्या देतोस, तु बाहेर गावातून पोट भरायला आलाय, असे म्हणून जातीचा उल्लेख करीत सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच उद्या तुझी अतिक्रमण मध्ये असलेली टपरी काढून फेकून देतो असे म्हणत पत्रकार झेंडे यांचे जुने तलाठी कार्यालय लगत असलेले दुकान (टपरी) हे कोणताही प्रशासकीय आदेश नसताना आणि कोणतीही नोटीस न देता बेकायदा जमाव जमवून काढून टाकली व त्यातील मुद्देमाल घेऊन गेले असे फिर्यादित म्हटले आहे. झेंडे यांच्या फिर्यादीवरून सरपंच, त्यांचे पती असे मिळून सुमारे 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.