अख्तर काझी
दौंड : दौंड मधील अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणाऱ्या मातंग समाजाच्या समस्या व मागण्यांकडे दौंड नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आज दि. 24 नोव्हेंबर रोजी दौंड नगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा बाबत ढिसाळ नियोजनावर आक्षेप घेत संतप्त महिलांनी नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.
साठे नगर परिसरातील पाणी प्रश्नासह इतर समस्यांबाबत नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे याचा निषेध म्हणून लहुजी शक्ती सेना नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे दोन दिवस आधीच प्रशासनाला कळविण्यात आले होते. मात्र नगरपालिकेने संघटनेशी किंवा साठे नगर मधील रहिवाशांशी संपर्क न केल्याने आज हंडा मोर्चा आंदोलन केले असल्याची माहिती लहुजी शक्ती सेनेने दिली. संघटनेचे पदाधिकारी शुभम साळवे, अनिल खंडाळे, नरेश ससाने, अमित मोरे, योगिता रसाळ, अर्चना शेंडगे, मीना मोरे, धरम बनसोडे, पांडुरंग गडेकर कार्यकर्ते ,महिला यावेळी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
साठे नगर परिसरात होणारा पाणीपुरवठा रात्री खूपच उशिराने होतो आहे, त्याचा त्रास येथील महिलांना सहन करावा लागत आहे. या परिसरातील पाणीपुरवठ्याची असणारी वेळ सायंकाळी 5 वा. ची आहे, त्यामुळे या वेळेतच व योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, उशिराने दिले जाणारे पाणी आम्हाला नको अशी मागणी संतप्त महिलांनी यावेळी केली.
सध्याच्या परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या पाणी साठवण तळ्यातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे, त्यामुळे दौंड शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने करावा लागत आहे. तसेच पाणी साठवण तलावामध्ये पाण्याची आवर्तनाची मागणी पाटबंधारे विभागास केलेली होती. त्यानुसार दि. 23 नोव्हेंबर रोजी तळ्यामध्ये पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. परंतु तळे भरण्यास काही कालावधी लागणार आहे. तळ्यातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा पुरेशा दाबाने पूर्ववत सुरळीत होईल. सदर भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल तसेच या परिसरातील विविध प्रश्नांकरिता मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे लेखी आश्वासन उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी आंदोलकांना दिले.
मुख्याधिकारी निर्मला राशिनकर रजेवर आहेत, त्यामुळे दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कापरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे पदभार देऊन 15 ते 20 दिवस झालेले आहेत परंतु कापरे अद्याप पर्यंत दौंड नगरपालिकेत आलेले नाहीत अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांनी दिली.