दौंड शहर : दौंड शहराचा आठवडे बाजार दर रविवारी भरत असतो, आणि आज नेहमीप्रमाणे तो भरलाही. आठवडे बाजारात भाजीपाला ,फळे व इतर साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपापली दुकाने मांडली होती. बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी सुद्धा होती. मात्र दुपारनंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि सर्वांची धांदल उडाली.
बाजारात विक्रेत्यांनी उभारलेली पाले उडाली. बाजार तळावरून जवळच असलेल्या आलमगीर मशीद परिसरातील गोदामाची पत्रे कागदाच्या पत्त्या प्रमाणे उडून रस्त्यावर येऊन पडली. नेहमी वर्दळ असणाऱ्या या परिसरात आज मात्र थोडीशी वर्दळ कमी असल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. अचानक बदललेल्या या वातावरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारासाठी आलेल्या ग्राहकांनी लवकरच घरी जाणे पसंत केले.
त्यामुळे आठवडे बाजारातील बहुतांशी विक्रेत्यांचे नुकसान झाले. वातावरण पाहून मोठा पाऊस पडेल अशी सर्वांना अपेक्षा होती परंतु पावसाने मात्र पाठ फिरविली. त्यामुळे वातावरणातील उकाडा तसाच कायम राहिला. यंदाचा उन्हाळा दौंडकरांसाठी फारच कडक गेला आहे. त्यामुळे उकाडा असह्य झालेल्या दौंडकरांना आता पावसाची ओढ लागली आहे.