अब्बास शेख
दौंड : दौंड तालुका हा चोहो बाजुने सुजलाम, सुफलाम असलेला तालुका. रेल्वे, हायवे, नदी, कॅनॉल अश्या आर्थिक गरजा पूर्ण करून विकासाला चालना देणाऱ्या या गोष्टी तालुक्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले. मात्र याच तालुक्याने मागील काळात बाहेरून येणाऱ्या आणि तालुक्यात तयार झालेल्या गुंडांचा मोठा हैदोस पाहिला होता. या गुंडगिरीला गेल्या दहावर्षांत डोके वर काढण्याचा चांसच मिळत नव्हता. मात्र आता या पिलावळी पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे दिसत आहे.
गुंडांच्या हवेवर जगणारे काहीजण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुरगुरू लागले आहेत. आमची सत्ता येऊ द्या, मग एक एकाला पाहतो अश्या धमक्याच काहीजण देऊ लागले आहेत. त्यामुळे नेमकी कुणाची सत्ता आल्यावर या गुंडांना अभय मिळणार आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक पुन्हा काय कांड करणार या विचाराने तालुक्यातील लोकं पुन्हा एकदा भयभीत होऊ लागले आहेत. तालुक्याला गुंडगिरीची जुनी ओळख आहे. निवडणुका आल्या की बाहेरून गुंड यायचे अण तालुक्यात दहशत निर्माण करायचे. विरोधात जाईल त्याला उचलून हवेली तालुक्यात घेऊन जायचे असा किस्सा आजही अनेकजण सांगतात. तालुक्यात वाळू वरून झालेला रक्तरंजित संघर्षही लोकांनी पाहिला आहे.
या अश्या कृत्यांमुळे तालुक्यात कायम दहशतीचे वातावरण पहायला मिळत असायचे. या दहशती इतक्या भयानक होत्या की ज्यांनी तो काळ पाहिला आहे त्यांच्या अंगावर आजही त्या आठवणी काढल्यानंतर शहारे येतात. मागील काळात क्रिमिनल रेकॉर्ड असणारे गुंड आणि त्यांना व्हाईट कॉलर कडून मिळणारी साथ हे जणू समीकरणच बनले होते. मात्र गेल्या काही वर्षांत या गुंडांना सळो की पळो झाली करून सोडण्यात आले होते. यांची भाईगिरी पोलिसांकडून मोडीत काढल्याने प्रत्येकजण कारवाई होईल या भीतीने स्तब्ध होता. पोलीस प्रशासनाचा वापर करून सर्वसामान्यांना त्रास दिला जातो असा कांगावाही काहींनी केला होता.
आता पुन्हा एकदा अश्याच धमक्या सोशल मीडियावर सुरु झाल्याचे दिसत आहे. या धमक्यांना खतपाणी घालणारी यंत्रणा ही वाखारी हद्दीत असणाऱ्या एका आलिशान हॉटेलमध्ये मिटींगा घेऊन राबवली जात आहे. सोशल मिडीयावर कुणाला कसे ट्रोल करायचे, कुणी शिव्या द्यायच्या, कुणी कुरखोडी करायची, कुणी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना त्रास द्यायचा अण कुणी पाठीवरून हात फिरवायचा ही सर्व कामे वाटून दिली गेली आहेत.
या सर्व प्रकारामुळे गुंडगिरीची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियाची जागा व्यापू लागली आहे. या तालुक्यात पुन्हा गुंडाराज सुरु होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मतदारांना जागरूक राहून मतदान करावे लागणार आहे. अन्यथा जे हाल बापाच्या वाट्याला आले ते पुन्हा पोराच्या वाट्याला येऊ नये अशीच प्रार्थना सोशल मीडियावर येणारे मेसेज पाहून लोक करू लागले आहेत.