अख्तर काझी
दौंड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल करण्यात आलेले वक्तव्य हे बेजबाबदार पणाचे असल्याचा आरोप शिवप्रेमींनी करत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा दौंडकर शिवप्रेमींकडून निषेध करण्यात आला.
याबाबत शिवप्रेमींनी बोलताना महाराष्ट्रबद्दल राज्यपाल हे नेहमीच बेताल वक्तव्य करतात मात्र राज्यपाल यांनी यावेळी शिवरायांचा अपमान होईल असे वक्तव्य करून तमाम शिवप्रेमींचे मन दुखावण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कृत्याचा आम्ही दौंड मधील शिवप्रेमी रास्ता रोको आंदोलन करीत निषेध नोंदवित आहोत असे मत यावेळी आंदोलकांनी मांडले. यावेळी राजन खटी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, सचिन कुलथे, अशोक जगदाळे, निखिल स्वामी, विक्रम पवार, कैलास शहा, उमेश वीर ,मोहन नारंग, नामदेव राहींज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून कोशारी यांच्या वक्तव्यावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचे षडयंत्र राबविले जात आहे. ऐतिहासिक चित्रपटांमधून महाराजांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे त्यांचा खोटा इतिहास दाखविला जात आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक या महाराष्ट्र भूमीत निर्माण झाले, त्यांनी ब्रिटिशांकडून स्वातंत्र मिळविले. आणि छत्रपती शिवराय या सर्व क्रांतिकारकांचे आदर्श होते. जगात महाराजांची लोकप्रियता पोहोचली असताना महाराष्ट्रात काही मंडळी सतत शिवरायांची बदनामी करीत आहेत. छत्रपती आमचे आदर्श आहेत, श्वास आहे, जीवन आहे हे सर्व माहीत असताना कधी चित्रपट तर कादंबऱ्यांच्या माध्यमातून छत्रपतींविषयी गैरसमज पसरविण्याचे काम काही मंडळींकडून सतत केले जात आहे. अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
कोशारी दुसऱ्यांदा शिवरायांविषयी बोलले आहेत, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम ते सतत करीत असतात म्हणून अशा प्रकारचा राज्यपाल महाराष्ट्रात राहता कामा नये ही भूमिका महाराष्ट्राची राहील. या राज्यपालांना पुन्हा दिल्लीत बोलवावे महाराष्ट्रात ठेवू नये अशी मागणी यावेळी संतप्त शिवप्रेमींनी केली.