संपूर्ण भारतातील ‛जैन’ ऋषीमुनींना सरकारने सुरक्षा पुरवावी, ‛सकल जैन संघाची’ राष्ट्रपतींकडे मागणी

अख्तर काझी

दौंड : भारतामधील जैन मंदिराचे, तीर्थक्षेत्रांचे इतर समाजाकडून बेकादेशीरपणे ताबे घेतले जात आहेत, जैन ऋषीमुनींच्या हत्या घडवून आणल्या जात आहेत. अशा वाढत्या घटनांचा समस्त दौंड सकल जैन समाजाच्या वतीने आज(दि.20) निषेध नोंदविण्यात आला. तसेच देशाच्या राष्ट्रपतींकडे, सकल जैन समाजाच्या वतीने, संपूर्ण भारतातील जैन ऋषीमुनींना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रपतींकडील मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी संघपती शांतीलाल मुनोत, सुशील शहा, घिसुलाल सोलंकी तसेच मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया, स्वप्निल शहा, तुषार दोषी, सुजित कोठारी, संदीप वागजकर, संजय टाटिया, रुपेश कटारिया, डॉ. महेंद्र मुनोत, राहुल कटारिया, शशी मुनोत, गणेश जगदाळे तसेच महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. सकल जैन समाजाच्या वतीने संपूर्ण विश्वामध्ये शांती ,भाईचारा आणि जियो और जीने दो चा संदेश पोहोचविला जातो. देशावरील प्रत्येक कठीण प्रसंगावेळी जैन समाज मदतीसाठी सर्वात पुढे असतो. असे असताना जैन ऋषीमुनींवर घडवून हल्ले होत आहेत, जैन समाजाच्या धार्मिक स्थळांचा इतर समाजाकडून ताबा घेण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.

काही सिद्धक्षेत्रांचा ताबा अशा लोकांकडे गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यांचा ताबा पुन्हा जैन समाजाला मिळावा यासाठी सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. जैन समाज हा अल्पसंख्यांक आणि अहिंसावादी असल्याने त्यांच्याकडून कोणत्याही इतर समाजाला कसलाही त्रास दिला जात नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन देशात ज्या- ज्या ठिकाणी जैन समाज राहतो आहे त्या- त्या ठिकाणी त्यांचे रक्षण करणे भारत सरकारची जबाबदारीच आहे. त्यामुळे जैन समाजाच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदना मधून करण्यात आली आहे.