लग्न केलं, बायको आणली पण ते सगळं खोटं निघालं..! केडगाव येथील युवकाची मोठी फसवणूक

पुणे : दोघांनी लग्नाळू युवकाला लग्नाचे आमिष दाखवून त्याची आर्थिक फसवणूक केल्याची घटना दौंड तालुक्यातील केडगाव येथे घडली आहे. याबाबत नवनाथ बाळासाहेब थोरात (वय 30, रा.केडगाव, हुमेवस्ती ता.दौंड) या युवकाने फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून सिमा निलेश भारती, निलेश शंकर भारती व दीपाली (तिघे रा. वाघोली, पुणे) या तिघांवर खोट्या लग्नाचा कट रचून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिमा भारती आणि निलेश यांनी नवनाथ थोरात यास, आम्ही कन्या प्रतिष्ठान संस्थेत काम करतो. आम्ही आत्तापर्यंत भरपुर मुला-मुलींची लग्न करून दिली आहेत. तुझेपण चांगल्या मुलीबरोबर आळंदी (पुणे) येथे लग्न लावुन देतो, तुं आम्हाला दोन लाख रूपये दे, असे म्हणुन नवनाथ थोरात या युवकाचा विश्वास संपादन केला. त्यास मोबाईलमध्ये असलेले मुलींचे फोटो दाखवुन त्याचे दिपाली नावाच्या मुलीशी लग्नाचा बहाणा करून खोटे लग्न लावुन दिले.

लग्न लावून देण्याच्या बदल्यात आरोपिंनी नवनाथ याच्याकडून वेळोवेळी 1 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम घेवुन त्याची फसवणुक केली असल्याचे त्याने म्हटले असून त्याच्याशी लग्नाचा बहाना केलेल्या तरुणीने मला सोडचिठठी दिली नाहीतर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
हा सर्व प्रकार कट रचून फसवणूक केल्याचा असून याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि लोखंडे करीत आहेत.