पुणे : काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचा अल्पसंख्याक सेल चा अध्यक्ष समीर मनूर याचा काल दुपारी पुण्यात खून करण्यात आला होता. पिस्तूलातून तब्बल सहा गोळ्या समीर मनूरवर झाडण्यात आल्या होत्या ज्या त्याच्या डोक्यात घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आता या खुनामागचे कारण पोलीसांनी शोधून काढले असून हा खून आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचं पोलीस तपासत समोर आलं आहे.
समीर मनूर चा खून करणाऱ्या आरोपींमध्ये त्याच्या एका मित्राचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मेहबूब बनोरगी असं समीरच्या मित्राचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
समीर मनूर याची काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदार संघाचा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाली होती. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच त्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
समीर मनूर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात थांबला असता तेथे दुचाकीवरून तिघांनी येऊन त्याची झाडून हत्या केली होती. हा खून आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचे आणि त्यामध्ये समीरच्या मित्राचा हात असल्याचे आता पोलीस तपासात पुढे येत आहे.