सुपे (बारामती) : मुंबईवरून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने जेवणासाठी जेजुरी मोरगाव रोडलगत असणाऱ्या हॉटेल सृष्टी येथे थांबून वाॅश बेसिनमध्ये हात धुवत असताना सोन्याच्या दोन अंगठ्या बाजूला काढून ठेवल्या आणि तो त्या तशाच विसरून गेला. ज्यावेळी त्याला याची जाणीव झाली त्यावेळी त्याने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मात्र तोपर्यंत त्या अंगठ्या गायब झाल्या होत्या. याची तक्रार सुपे (ता.बारामती) पोलिसांकडे गेल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार किसन ताडगे आणि महादेव साळुंखे यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासांमध्ये या संपूर्ण घटनेचा छडा लावून तक्रारदार यांच्या अंगठ्या शोधून दिल्या आहेत. त्यांच्या या कार्याचे सुपे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप संभाजी वानखेडे (राहणार विरार, मुबंई) हे देवदर्शनासाठी जेजुरी येथे आले होते. ते जेजुरी येथून मोरगाव येथे जात असताना जेजुरी ते मोरगाव रोडलगत असणाऱ्या आंबी पाटी येथील हॉटेल सृष्टी येथे जेवण करण्यास थांबले होते. त्यांनी त्यांच्या हातातील पाच-पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हॉटेल सृष्टी येयील वॉश बेसिन जवळ काढून ठेवल्या आणि त्या ते तेथेच विसरले.
या सर्व प्रकरानंतर त्यांनी सुपा पोलीस स्टेशन येथे येउन सोन्याच्या अंगठ्या गहाळ झाल्याची तक्रार दिली. यानंतर सुपा पोलीस स्टेशन येथे गहाळ केस रजि.नं.73/2025 नुसार हे प्रकरण दाखल करण्यात आले आणि सुपा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांना सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी योग्य त्या सूचना देऊन तक्रारदार यांच्या सोन्याच्या अंगठ्या शोधण्याच्या सुचना देण्यात आल्या.
या नंतर पोलिस अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांनी तातडीने हॉटेल सृष्टी व मोरगाव येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तक्रारदार यांच्याकडून माहिती घेत संशयित तवेरा गाडी निष्पन्न करून गाडी मालकास संपर्क साधून त्यांना सुपा पोलीस स्टेशन येथे बोलाून घेऊन चौकशी केली. त्यावेळी गाडीत असणाऱ्या एका महिलेकडे विचारणा केली असता त्यांनी हॉटेल सृष्टी येथील वॉश बेसिनवर दोन अंगठ्या सापडल्या असल्याचे सांगितले.
सदरच्या गहाळ झालेल्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या सुपे पोलिसांनी तत्पर तपास करत हस्तगत केल्या आहेत. तसेच तक्रारदार संदीप संभाजी बानखेडे यांना सुपा पोलीस स्टेशन येथे बोलवून हा मुद्देमाल त्यांच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे.