अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील गजबजलेल्या हुतात्मा चौकात दौंडकरांनी आज मुलींची हाणामारी आणि भाईगिरीचा अनुभव घेतला. साधारणतः दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यानची वेळ, तीन मुली दुचाकीवरून हुतात्मा चौकात येतात, त्यांना त्या ठिकाणी एक मुलगी उभी असलेली दिसते, म्हणून त्या तिघी दुचाकीवरून उतरतात व थेट त्या मुलीला मारायलाच सुरुवात करतात. त्यांची हाणामारी रस्त्यामध्ये सुरू होते. रस्त्यावरून जाणारे- येणारे आपली वाहने थांबून त्या हाणामारीची मजा घेतात. तोपर्यंत संपूर्ण चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. मात्र या मुलींमध्ये हाणामारी नक्की कोणत्या कारणासाठी चालू आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती.
तेवढ्यात त्या मुलीला मारहाण करणाऱ्या त्या तिघींपैकी एक त्या मुलीला मारताना म्हणते की, तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेजच का केला?व अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करीत त्या मुलीला मारहाण करते. तेव्हा लोकांना कळते की एका प्रियकरासाठी दोन मुलींमध्ये मारामारी जुंपली आहे. हे ऐकल्यानंतर प्रचंड हशा पिकतो, व लोक हसत हसत हाणामारीचा आनंद घेतात. आपल्या प्रियकराला हीच मुलगी मेसेज करते म्हणून तिने त्या मुलीला बदडले ते सुद्धा शहरातील गजबजलेल्या भर चौकात.
दरम्यान कोणीतरी पोलिसांना फोन केला व त्यांना घटनेची माहिती दिली तसेच चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली असल्याचे सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी तत्काळ वाहतूक पोलीस कर्मचारी बंडगर तिथे आले व त्यांनी सर्वांना पांगवून वाहतूक सुरळीत केली. सिनेस्टाईल हाणामारी संपल्यानंतरही कितीतरी वेळ त्या ठिकाणी जमलेले लोक व स्थानिक व्यापारी या हाणामारीच्या व त्या मुलींच्या झालेल्या संभाषणावर चर्चा करीत होते.
या मुली कोणत्या थराला गेल्या आहेत, या मुलींना कशाचीच भीती नाही? की आपण भर रस्त्यात कोणत्या कारणावरून हाणामारी करीत आहोत, हे आपल्या घरी कळाले तर काय होईल? किंवा एखादे वेळेस आपल्याला पोलीस स्टेशनला बोलावले जाईल. परंतु या सगळ्या गोष्टींची त्या मुलींना फिकीरच नसावी या पद्धतीने त्या रस्त्यावर वागत होत्या. आज पर्यंत दौंड मध्ये रस्त्यात मुलीसाठी मुलांच्या गटात भांडणे होताना दिसत होती, आता मुलीही आपल्या प्रियकरासाठी रस्त्यावर भांडणे करीत आहेत हे दौंडकारांनी अनुभवले असून तो भाग्यशाली बॉयफ्रेंड कोण याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.