अब्बास शेख

दौंड : जिल्हापरिषद, पंचायत समितीचे आरक्षण जैसे थे असेच राहिले आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे. कारण अनेक ठिकाणी इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली होती मात्र आरक्षण फायनल होईपर्यंत कोणीच आपले थेट मत व्यक्त करत नव्हते. आता मात्र आरक्षण फायनल झाले असून उद्यापासून चौका चौकात राजकीय गप्पांना आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या चर्चेला उधाण येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकाची माहिती दौंडचे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२५ च्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून त्याची अंतिमरित्या प्रसिद्धी करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले होते. सदर आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत दिनांक १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी काढण्यात आली व निवडणूक विभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करुन त्यावर दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
सदर प्राप्त हरकती व सूचनांवरील अभिप्राय विचारात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये पूणे जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागांचे आरक्षणास विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी मान्यता दिली आहे आणि त्याअर्थीं राज्य निवडणूक आयोगाकडील अधिसूचना अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे पुणे जिल्हा परिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक विभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ दौंड तालुक्यातील आरक्षण अधिसूचित करण्यात आले आहे.

अगोदर काढण्यात आलेले आरक्षण हे जैसे थेच राहिल्याने आता दौंड तालुक्यातील सात जिल्हापरिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण यात मोठी चुरस पहायला मिळणार आहे.







