अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची कामाची मुदत संपल्याने सध्या शहरातील कचरा उचलण्याचे काम बंद आहे. शहरातील बहुतांशी प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य झाले असल्याचे चित्र आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदरच्या कामाचे टेंडर संपल्याने संबंधित ठेकेदाराकडून काम बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे प्रत्येक प्रभागातील कचरा रस्त्यावरच पडून आहे या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
जगदाळे यांनी नगरपालिकेला याबाबतचे निवेदन दिले आहे, यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख, माजी नगरसेवक जीवराज पवार, व्यापारी प्रभाकर कोरे,
दीपक विघ्ने आदी उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. नगरपालिकेच्या वतीने कचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू होते परंतु सदर कामाच्या टेंडरची मुदत संपल्याने सध्या शहरातील कचरा उचलणे बंद झाल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच सन 2022-23 व सन 2023-24 या दोन्ही वर्षात टेंडरची रक्कम यामध्ये झालेली वाढ याबाबत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा त्याचप्रमाणे सदरच्या टेंडरची मुदत संपण्याआधीच नगरपालिकेने पुढील टेंडरची कार्यवाही करणे आवश्यक होते आणि आता ही कार्यवाही होईपर्यंत नगरपालिकेने कचरा व्यवस्थापनाबाबत काय योजना केल्या आहेत याचा सुद्धा खुलासा करावा असे निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत सहकारनामा प्रतिनिधीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, कचरा संकलन व व्यवस्थापन या कामाचे टेंडर संपलेले आहे, नवीन टेंडरच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. साधारणतः एक ते दीड महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तोपर्यंत नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे, येत्या दोनच दिवसांमध्ये शहरातील ही समस्या सोडवली जाणार आहे.