पाटाच्या वादातून खडकी येथील शेतकरी कुटुंबास तलवार, लोखंडी रॉड ने जबर मारहाण, 11 जणांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद

दौंड

दौंड तालुक्यातील खडकी येथील एका शेतकरी कुटुंबाला शेतीत असणाऱ्या पाण्याच्या पाटाच्या वादातून 11 जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. मारहाणीत लोखंडी रॉड, तलवार, काठ्यांचा वापर करीत मारहाण करण्यात आली आहे.

मारहाणीत एका महिलेसह तिघांना जबर मार लागला असून एकाच्या तोंडावर तलवारीने वार करण्यात आले असून त्याच कुटुंबातील वयस्क व्यक्तीच्या डोक्याला लोखंडी रॉड ने गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर दौंड येथील खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या वयस्क व्यक्तीची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी अरुण झुंबर गायकवाड (रा. खडकी,ता. दौंड) यांनी फिर्याद दिली असून संतोष चंदन गायकवाड, सयाजी हनुमंत गोफणे, सचिन हनुमंत गोफणे, गोपाळ गायकवाड, ज्योती संतोष गायकवाड, धनाबाई बबन गायकवाड, अलका गोपाळ गायकवाड (सर्व रा. खडकी) व सोबत चार अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भावकीतील संतोष गायकवाड यांच्यासोबत शेतातील रस्त्याच्या व पाण्याच्या पाटाच्या कारणावरून वाद सुरू आहे. दि.3 जून रोजी दु.12 वा. सुमारास फिर्यादी, भाऊ, भावजय, मुलगा व पुतण्या शेतात काम करीत असताना पाटकरी शेतात आले असता, फिर्यादी यांनी त्याला आमचा पाट कधी दुरुस्त होणार याची विचारणा केली. पाटकरी याने आरोपी संतोष गायकवाड यास फोन करून शेतात बोलावून घेतले. व तू पाण्याच्या पाटाचे नुकसान केले आहे ते कधी दुरुस्त करून देणार म्हणून विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की गावातील पुढारी आणतो आणि त्यांनी पाहिल्यानंतरच दुरुस्त करतो, असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर पाटकरी ही शेतातुन निघून गेले. थोड्या कालावधीने आरोपी संतोष व इतर सर्व आरोपी शेतात आले व त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अरे यांना हाणा, एका एका चा मुडदा पाडा, आज यांना सोडायचे नाही असे आरोपी संतोष आपल्या साथीदारांना ओरडून सांगत होता. सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी व त्यांच्या भावास तलवारी, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. घरातील इतर लोक व महिला त्यांना वाचविण्याकरिता आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत फिर्यादी व त्यांच्या भावास गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीमध्ये फिर्यादी व इतरांना दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दौंड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. फिर्यादी यांच्या भावाची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.