| सहकारनामा |
दौंड : अख्तर काझी
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास संबंधित दवाखान्याने त्या कर्मचाऱ्याला मोफत उपचार द्यावेत अशी मागणी दौंड शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनामध्ये नमूद मागणी नुसार शहर व परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शहरातील व परिसरातील खाजगी दवाखाने सुद्धा बाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. या दवाखान्यातील कर्मचारीवर्ग आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहे. यापैकी बहुतांशी परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगारांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.
बाधित रुग्णांची सेवा करताना यापैकी कोणाला कोरोना झाला तर सदर दवाखान्या कडून त्याच्या उपचाराची जबाबदारी घेतली जात नाही असे निदर्शनास येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या दवाखान्या मध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रित्या काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोना ची लागण झाल्यास त्याचा उपचार संबंधित रुग्णालयाने मोफत केला पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी पक्षाचे दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, अजय कटारे, प्रसाद कदम, चेतन लवांडे, गणेश झोजे, अजित फुटाणे, दत्ता मधुरकर आदी उपस्थित होते.