‛गड-किल्ल्यांवर’ जाऊन तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावणारे ‛अवलिया’, राजमुद्रा ट्रेकर्स ग्रुपचा अनोखा उपक्रम

अब्बास शेख

पुणे ग्रामिण – राज्यातील विविध गड- किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला दिसून येतो. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येत आहे. त्यामुळे काही काळाने या विशाल वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे रूप विद्रुप होण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची शान असणारे हे गड-किल्ले आणि त्यांच्या परिसराचे संवर्धन आपणच आपल्या परिश्रमातून केले पाहिजे या हेतूने प्रेरीत होऊन पुणे जिल्ह्यात असणाऱ्या दौंड तालुक्यातील वरवंड या गावच्या ‛राजमुद्रा ट्रेकर्स’ या ग्रुपकडून राज्यातील विविध गड-किल्ल्यांवर असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावून संवर्धन करण्यात येत आहे.

‛राजमुद्रा ट्रेकर्स’ या ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत राजगड, तोरणा, हडसर, रायगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, मल्हारगड, सिंहगड या सारख्या गडाचे ट्रेक करण्यात आले असून गडावर असणारा सर्व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
या ग्रुपने भविष्य काळासाठी एक योजना आखली असून या पुढे जेवढे ट्रेक या ग्रुपचे होतील त्या सर्व गड-किल्ल्यांवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून त्याचे संवर्धन या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

राजमुद्रा ट्रेकर्स वरवंड या ग्रुप चे उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या ट्रेकर्स ग्रुपमध्ये सुरवातीला पाच सदस्य होते मात्र आता त्यांची संख्या वीस च्या पुढे झाली आहे.
या ग्रुपमध्ये प्रामुख्याने विशाल म्हस्के, सुरज दिवेकर, शकील सारवाड सर, मनोज निंबाळकर, रणजित इथापे, शरद गायकवाड, सागर जगताप, शैलेश जगताप, ओंकार दिवेकर, संदीप दिवेकर, गोपीनाथ भोंडवे, विकीराज दिवेकर, प्रथमेश दिवेकर, ऋषिकेश दिवेकर, संतोष दिवेकर, निखिल सातपुते, सुरज कदम, अक्षय दिवेकर, अजित शिवकर, गौरव दिवेकर, ऋषिकेश जाधव हे सदस्य आहेत.

या सदस्यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना “आपला महाराष्ट्र गड-किल्ल्यांनी भरलेला असून ते आपल्या महाराष्ट्राची शान आहेत, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाने ट्रेकिंग हा छंद जोपासताना ट्रेकिंग बरोबरच किल्ल्यावर किव्वा गडावर आल्यावर आपले गडकिल्ले कसे स्वच्छ, सुरक्षित राहतील आणि पिढ्यानं पिढ्या हे असच सर्वांनां दिसत राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.