दौंड (अब्बास शेख) : माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार दौऱ्यांना आजपासून सुरुवात झाली. आज त्यांनी खोपोडी, नानगाव, कानगाव, हातवळण, कड़ेठाण, खोपोडी, दापोडी यांसह आसपासच्या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले.
यावेळी त्यांच्यासोबत मा.सभापती आप्पासाहेब पवार, माजी जि.प सदस्य राहुल उर्फ बाळासो कापरे, नामदेव ताकवणे, डॉ.भरत खळदकर, डॉ.मोहिते मॅडम, दिग्विजय जेधे, रामभाऊ टुले यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी थोरात यांनी आपल्या भाषणात केले.
दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये पुन्हा एकदा सरळ लढत होत असून यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पहायला मिळणार आहे. दोन्हीही नेते आपापल्या परीने मतदारांसमोर जाऊन आपले म्हणणे मांडत असून आपलाच विजय होणार असा विश्वास दोन्हीकडून व्यक्त केला जात आहे.