पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी आवारात अज्ञात इसमांनी स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही गोळीबाराची घटना दिवसा ढवळ्या घडल्याने एकच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात कंपनी मालक गंभीर जखमी असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार चाकण एमआयडीसी परिसरात आज सोमवारी सकाळी 11 ते 11:15 च्या दरम्यान स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजित सिंग हे कंपनीत उभे होते. यावेळी प्रवेशद्वारावर अचानक आलेल्या दुचाकी स्वारांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात अजित सिंग यांच्या पाठीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
चाकण येथील कंपनी मालकावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर गुन्हे शोध पोलिसांच्या पथकाने कंपनीच्या आत, बाहेरील सीसीटीव्ही फुटेज व इतर फुटेज तपासले असून लवकरच या गोळीबारामागे कोण आहे याची माहिती समजेल असे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले.