अख्तर काझी
दौंड : दौंड -पाटस रस्त्या लगत असणाऱ्या महावितरणच्या विद्युत रोहित्रा(डीपी) शेजारी जमा झालेल्या कचऱ्याच्या ढिगार्याला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे विद्युत रोहित्र (डीपी) सुद्धा आगीच्या भक्षस्थानी येता येता राहिली.
आग लागण्याची घटना सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी लागलीच महावितरण कार्यालयाला घटनेची माहिती देत सदर ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद करण्याची विनंती केली. महावितरणने सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सदर ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद केला. स्वामी यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सुद्धा घटनेची माहिती दिली व सदर ठिकाणी अग्निशामक बंब पाठविण्याबाबत कळविले. नगरपालिकेचे अधिकारी शाहू पाटील यांनी खबर मिळताच अग्निशामक दलाला घटनास्थळी पाठविले, पथकाने वेळेतच आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
परंतु सदर घटनेमुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नगरपालिकेने सध्या शहरातील कचर कुंड्या उचललेल्या असल्याने नागरिक आपल्या घरातील, दुकानातील कचरा कोठेही उघड्यावर टाकत असल्याचे दिसत आहे. काही नागरिक रात्रीच्या वेळेस शहराबाहेरील रस्त्यांच्या लगत कचरा टाकत आहेत. अशाच प्रकारे सदरच्या डीपी शेजारी सुद्धा कचऱ्याचा ढीग जमा झालेला होता. कचऱ्याला अचानकपणे लागलेल्या (की लावलेल्या) आगीमुळे ही घटना घडली.
सदैव वाहतूक असलेल्या रस्त्यालगतच्या डीपीला आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. नगरपालिकेने शहरात उघड्यावर जमा होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर काहीतरी तोडगा काढून दौंडकरांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.