पुणे : विद्यमान आमदार आणि पुणे लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आज. लोकसभा निवडणुकीत विरोधक पैसे वाटप करत असल्याचा आरोप करून रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. याच कारणामुळे आता धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहकारनगर पोलिस ठाण्यात धंगेकर यांनी येऊन विरोधक या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. पोलिस फक्त बघ्याची भूमिका बजावत आहेत. त्यांच्याकडे तक्रार केली तरीही ते काहीच कारवाई करत नसल्याचे धंगेकर यांचे म्हणणे होते. पोलिस कारवाई करत नसल्याचे पाहून त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते. याच ठिय्या आंदोलनावरून रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार अभिजीत बालगुडे यांच्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात नितीन मधुकर कदम, रवींद्र धंगेकर, सचिन देडे, अक्षय माने, आबाजी साकीब, संतोष पंडीत, अनिल सातपुते व इतर 35 ते 40 जणांवर भादवी कलम 143, 145, 149, 188 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, लोकप्रतिनीधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे करीत आहेत.